टिळ्यासाठी जाणाऱ्याच्या खुनप्रकरणी दोन अल्पवयीन ताब्यात

अनिला हा आम्हाला येता-जाता शिवीगाळ करत असे. तर, अधून-मधून मारहाणही करत होता. तसेच, सिगारेट व गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी पैसे घेत असत. पैसे न दिल्यास मारहाण करत होता. दोन महिन्यांपुर्वी त्यांच्यात वाद झाल्यानंतर अनिल जाधव याने साथीदारांच्या मदतीने त्यांना मारहाण केली होती. याचा राग मनात धरून त्यांनी अनिल याचा खून केला आहे.

    पुणे : लग्नाचा टिळा लागण्यापुर्वीच भररस्त्यात २० वर्षीय तरुणाचा तलवारीने सपासप वारकरून खून करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या पोलीसांनी दोन तासात पकडले. घरी येता-जाता तरूण शिवीगाळ करत असे अन सिगारेटसाठी पैसे मागत होता. पैसे न दिल्यास त्यांना मारहाण करत असे. सततच्या त्रासाला चिटून या अल्पवयीन मुलांनी त्याला ठार मारल्याचे समोर आले आहे. अलंकार सारख्या उच्चभ्रु परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. खूनाचा थरार पाहणाऱ्या नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता.
    अनिल राजेंद्र जाधव (वय २१, रा. डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने १७ वर्षीय दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर, अलंकार पोलीसांनी देखील एकाला पकडले आहे.

    अनिल याचा विवाह ठरला होता. त्याच्या टिळ्याचा कार्यक्रम रविवारी रात्री होता. त्यानिमित्त घाई-घडबड सुरू होती. दरम्यान, अनिल हा बहिणीला सोडण्यासाठी लक्ष्मीनगर येथे आला होता. बहिणीला सोडून तो दुचाकीवरून जात होता. पोतनीस परिसरातून केफिप्टी रस्त्याने जात असतानाच अचानक पाठिमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्याच्यावर कोयता व तलवारीने सपासप वार केले. भररस्त्यातच त्याच्यावर वार करण्यात येत असल्याने एकच खळबळ उडाली होती. काही क्षणात तो रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडला. त्यानंतर हे तिघे पसार झाले होते. दरम्यान, याघटनेने या भागात चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु, हा खून कोणी आणि का केला हे समजू शकत नव्हते.

    जाता येता शिवीगाळ करत असल्याचा राग

    गुन्हे शाखेकडून या हल्लेखोरांचा शोध घेतला जात होता. त्यावेळी पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा खून दोन अल्पवयीन मुलांनी केला असून, ते चांदणी चौकात आहेत. या माहितीची खातरजमा करत या परिसरात सापळा रचला व या दोघांना पकडले. त्यावेळी दोघेही अल्पवयीन असल्याचे समजले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्या दोघांनी सांगितले की, अनिला हा आम्हाला येता-जाता शिवीगाळ करत असे. तर, अधून-मधून मारहाणही करत होता. तसेच, सिगारेट व गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी पैसे घेत असत. पैसे न दिल्यास मारहाण करत होता. दोन महिन्यांपुर्वी त्यांच्यात वाद झाल्यानंतर अनिल जाधव याने साथीदारांच्या मदतीने त्यांना मारहाण केली होती. याचा राग मनात धरून त्यांनी अनिल याचा खून केला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकने केली आहे.