पानोरा व राळापेठ नदीपात्रातून रेतीची तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त; सभापतीचा नवराच निघाला वाळूचोर, कारवाईने भाजप अडचणीत

ऐन निवडणुकीच्या धामधूमीत भाजपच्या पंचायत समितीच्या सभापतीचे नवरोबा रेती तस्कर निघाल्याने गोंडपिंपरी भाजपा अडचणीत आलं आहे. रेती तस्करी करीत असताना महसूल विभागाने सभापती सुनिता येग्गेवार यांचे पती भानेश येग्गेवार यांच्यावर कारवाई केली आहे.

  चंद्रपूर (Chandrapur) : ऐन निवडणुकीच्या धामधूमीत भाजपच्या पंचायत समितीच्या सभापतीचे नवरोबा रेती तस्कर निघाल्याने गोंडपिंपरी भाजपा अडचणीत आलं आहे. रेती तस्करी करीत असताना महसूल विभागाने केलेल्या कारवाईत गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती सुनिता येग्गेवार यांचे पती भानेश येग्गेवार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर सापडला. महसूल विभागाने केलेल्या कारवाईने भाजपच्या गोटात सन्नाटा पसरलाय.

  गोंडपिपरी तालुक्यात रेती तस्करांनी धुमाकुळ घातला आहे. रेती, मुरुमाची चोरी सुरु असताना महसूल विभागाने आज पानोरा व राळापेठ नदीपात्रातून रेतीची तस्करी करणारे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले.

  यातील एक ट्रॅक्टर गोंडपिंपरी पंचायत समितीच्या सभापती सुनिता येग्गेवार यांचे पती भानेश येग्गेवार यांच्या मालकीचा आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाच्या सभापतीचे पती रेती तस्कर निघाल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावरुन प्रचारात रान उठवल्याने भाजप तोंडघशी पडलं आहे.

  गोंडपिंपरीत काँग्रेस उमेदवारांच्या समर्थनार्थ मंत्री विजय वडेट्टीवारांची सभा
  “आज जे दिल्लीच्या तख्तावर बसलेत ते स्वातंत्र्य संग्राम सुरु असताना इंग्रजांचे पाय चाटत होते”, अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केली आहे. काँग्रेस विचारांचा माणूसच खरा देशभक्त असल्याचं प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं.

  मंत्री विजय वडेट्टीवारांची चंद्रपुरातल्या गोंडपिंपरी येथे निवडणुकीच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत त्यांनी महाराष्ट्र भाजप तसंच केंद्र सरकारवर सडकून टीका केली. महागाई, राष्ट्रभक्ती, हिंदुत्ववाद, अशा विविध मुद्द्यांवरुन त्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले.

  विजय वडेट्टीवर म्हणाले, “माझ्यापुढे बसलेल्या देशभक्त, राष्ट्रभक्त मतदारांनो.. मुद्दाम तुमचा उल्लेख मी देशभक्त केला. तुम्ही ज्या विचाराने इथे बसलात तोच विचार देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. तुमचा विचार देशासाठी रक्त सांडत होता आणि आज जे दिल्लीच्या तख्तावर बसले आहेत ते इंग्रजांचे पाय चाटत होते. खऱ्या अर्थाने कुणी देशभक्त असेल तर तो काँग्रेसच्या विचारांचा माणूस आहे.”