दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकजण जागीच ठार, ३ गंभीर जखमी

दुपारच्या सुमारास अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी दिनेश आत्राम (२४), रामसाई सोयाम (६५), नागार्जुन आत्राम (१२) एम.एच. ३३ ए १५०६ या दुचाकी वाहनाने गुंडापल्ली येथे जात होते. तर त्यांच्या विरुद्ध दिशेने एटापल्ली येथील रहिवासी अरुण तेलकुंटलावार हे वाहन क्र. एम.एच. ३३ ए २३७० ने सिरोंचाकडे काही कामानिमित्य जात असतांना गोलाकर्जी गावाजवळ दोन्ही दुचाकीस्वाराची समोरासमोर जोरदार धडक बसली.

    गडचिरोली (Gadchiroli) : आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर असलेल्या गोलाकर्जी गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसली. यात एकाच जागीच मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात येत असून सदर घटनेची नोंद पोलीस स्टेशन अहेरी येथे करण्यात आली आहे.

    प्राप्त माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास अहेरी तालुक्यातील अर्कापल्ली येथील रहिवासी दिनेश आत्राम (२४), रामसाई सोयाम (६५), नागार्जुन आत्राम (१२) एम.एच. ३३ ए १५०६ या दुचाकी वाहनाने गुंडापल्ली येथे जात होते. तर त्यांच्या विरुद्ध दिशेने एटापल्ली येथील रहिवासी अरुण तेलकुंटलावार हे वाहन क्र. एम.एच. ३३ ए २३७० ने सिरोंचाकडे काही कामानिमित्य जात असतांना गोलाकर्जी गावाजवळ दोन्ही दुचाकीस्वाराची समोरासमोर जोरदार धडक बसली. या धडकेत अरुण तेलकुंटावार यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

    मृतक अरुण तेलकुंटावार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी व अपघातात झालेल्या गंभीर जखमींना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे दाखल करण्यात आले आहेत. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन अहेरी येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

    जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार हे सिरोंचा दौऱ्यावर जात असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी घटनास्थळी थांबून रुग्णवाहिका बोलवून जखमींना रुग्णालयात दाखल केले.