
महसूल राज्यमंत्री असताना तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कण्हेर उद्भव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर सत्तापालट झाला व श्रेयवादातून ही चांगली योजना बासनात गुंडाळली गेली.
सातारा : महसूल राज्यमंत्री असताना तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कण्हेर उद्भव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर सत्तापालट झाला व श्रेयवादातून ही चांगली योजना बासनात गुंडाळली गेली. योजनेकडे दुर्लक्ष झाल्याने शाहूपुरीसह परिसरातील नागरिकांना हक्काच्या पाण्यापासून सुमारे २० वर्षे वंचित राहावे लागले, याची खंत आहे. देर है लेकिन अंधेर नही है याचे समाधान असल्याचे सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट करत विरोधी गटावर निशाणा साधला.
कण्हेर योजना लोकार्पणाबाबतच्या उदयनराजेंनी पत्रकात म्हटले आहे, की कण्हेर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना त्याकाळी मार्गी लागली असती, तर त्यासाठी फक्त १६ कोटी लागले असते. त्यातून शाहूपुरी, शिवराज पेट्रोलपंपाच्या पूर्वेकडील वसाहतींसह योजना मार्गावरील १८ गावांना फायदा झाला असता. १९९९ मध्ये सत्ताबदल झाला. त्यानंतर योजनेसाठी आम्ही अनेक वेळा विनंती-आर्जव केले. मात्र, आम्हाला श्रेय मिळेल या संकुचित हेतूने ही चांगली योजना गुंडाळण्यात आली. ही योजना नंतरच्या काळात आम्ही मार्गी लावली.
नागरी सुविधा देताना श्रेयवादाची मानसिकता कोणीही बाळगू नये. श्रेयवाद ही संकुचित मानसिकता आहे. राजकारण्यांनी श्रेयवादापासून दूर राहिले पाहिजे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम शेवटी जनतेला भोगावे लागतात. सकारात्मक, व्यापक दृष्टिकोन ठेवत आम्ही नेहमी चालतच राहिलो. (कै.) दादामहाराज ऊर्फ प्रतापसिंह महाराज यांचा हा मार्गदर्शक पायंडा आहे. कण्हेर योजनेतून शाहूपुरीकरांना पाणी देऊ शकलो, याचा आनंद असल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद करत नाव न घेता श्रेयवादाच्या कारणावरून विरोधी गटावर टीका केली आहे.