‘आघाडी सरकार तीनचाकी रिक्षा, त्याची तीनही चाके…’; अमित शहांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने (Shivsena) भाजपचा (BJP) विश्वासघात केला आहे. हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा. तीनही पक्षांनी एकत्रित येऊन भाजपच्या विरुद्ध निवडणूक लढवावी, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे दिले.

  पुणे : महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने (Shivsena) भाजपचा (BJP) विश्वासघात केला आहे. हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा. तीनही पक्षांनी एकत्रित येऊन भाजपच्या विरुद्ध निवडणूक लढवावी, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी येथे दिले. आघाडी सरकार हे तीन चाकी रिक्षा असून, तीनही चाके पंक्चर झाली असून, धुर साेडून प्रदूषण करण्याशिवाय हे सरकार काहीच करीत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

  पुणे शहर भाजपच्या वतीने आयाेजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यात अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने काश्मिरमधील ३७० कलम हटविण्याचा निर्णय, राम मंदिराची उभारणी, काशी विश्वनाथ काॅरिडाॅर आदी आश्वसनांची पूर्तता केल्याचे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासाची उदाहरणे त्यांनी दिली. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विशेषत: शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जाेरदार टीका केली.

  महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेेबराेबर झालेल्या चर्चेत ती निवडणूक देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली लढली जाईल आणि मुख्यमंत्री भाजपचाच असे ठरले हाेते असे नमूद करीत शहा यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदूत्व साेडले. आता मी खाेटे बाेलत असल्याचा आराेप ते माझ्यावर करीत आहे. पण त्यावेळी झालेल्या प्रचारसभेत जे फलक लागले हाेते, त्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र माेदी (Narendra Modi) यांची छायाचित्रे माेठी हाेती.

  तुमची छायाचित्रे बारीक हाेती हे लक्षात ठेवा. तुमच्या प्रत्येक भाषणात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा उल्लेख हाेता. परंतु तुम्हाला मुख्यमंत्री बनायचे हाेते, त्यामुळे तुम्ही विश्वासघात केला. राज्यात सत्ता मिळविली पण सरकार काही चालवू शकले नाही. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा द्या, राज्यात पुन्हा निवडणूक हाेऊ द्या. तुम्ही तीनही पक्ष एकत्र येऊन लढा राज्यातील जनता तुमचा हिशाेब पूर्ण करेल, अशी टीका शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

  आघाडी सरकार तीन चाकी आहे. तीनही चाके वेगवेगळ्या दिशेने जात असल्याचे मी पूर्वी म्हटले हाेते. परंतु आता ही तीनही चाके पंक्चर झाल्याची स्थिती आहे. रिक्षा जागेवरून हालत नाही, केवळ धूर साेडून प्रदुषण निर्माण करीत आहे. हे सरकार कल्याण करू शकत नाही. महाराष्ट्राने दूध उत्पादन, परकीय गुंतवणूक आदी क्षेत्रात देशाला दिशा दिली. या क्षेत्रात राज्य आघाडीवर हाेते. हे जुने वैभव हे सरकार मिळवून देऊ शकत नाही. अशा या सरकारच्या अधाेगतीची सुरुवात ही पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाने झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

  अमित शहा यांचे खडेबाेल…

  – पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘डिबीटी ’याेजना सुरु केली. ‘डायरेक्ट बेनिफिशअरी ट्रान्सफर’ अशी ही याेजना असुन, आघाडी सरकारने डीबीटी याेजना स्वत:साठीच राबविली आहे, डीबीटी याेजनेचा अर्थ ‘डिलर, ब्राेकर आणि ट्रान्सफर’ असा घेत या सरकारचे काम चालू आहे.

  – केंद्र सरकारने पेट्राेल आणि डिझेलवरील कर कमी केले. भाजपचे सरकार असणाऱ्या राज्य सरकारने तेथील राज्य सरकारचे करही कमी केले. यामुळे या दाेन्ही इंधनाचे दर पंधरा रुपयांनी कमी झाले. पण महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील कर कमी न करता, दारुवरील कर कमी केला आहे. याचे उत्तर उद्धव ठाकरे सरकारला द्यावे लागणार आहे.