बार्शीत अवकाळी पावसाची रिपरिप; पेरू, सीताफळ, द्राक्षाचे नुकसान

बार्शी शहर व तालुक्यात गुरुवारी पहाटेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाच्या हजेरीमुळे प्रामुख्याने तालुक्यातील कांदा, द्राक्षे, पेरू आणि सीताफळ या बागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच हवेत गारठाही निर्माण झाला होता.

    बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बार्शी शहर व तालुक्यात गुरुवारी पहाटेपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. या पावसाच्या हजेरीमुळे प्रामुख्याने तालुक्यातील कांदा, द्राक्षे, पेरू आणि सीताफळ या बागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच हवेत गारठाही निर्माण झाला होता.

    शहराच्या सर्वच भागात पाऊस झाला. हवेत गारठा असल्याने रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. शाळेतून घरी परत जाताना अनेक विद्यार्थी भिजत असल्याचे चित्र दिसले. मागील चार दिवसांपासून शहर व तालुक्यात ढगाळ वातावरण होते. परंतु, आज सकाळपासूनच शहरात पावसाने हजेरी लावली होती. तालुक्यात पानगाव, पांगरी, खांडवी, दडशिंगे, कासारवाडी, बळेवाडी, कोरफळे याभागासह तालुक्यात सर्वत्र हा पाऊस असल्याचे पंचायत समितीचे कृषी अधिकारी अंधारे यांनी सांगितले. या पावसामुळे तालुक्यातील सुमारे सात हजार एकर क्षेत्रात द्राक्षे बागा आहेत. याचे खूप मोठे नुकसान झाल्याचे प्रगतीशील शेतकरी राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले.

    तालुक्यातील आगळगाव, काटेगाव, ताडसौदणे, भातंबरे, उम्बर्गे, पांगरी, मळेगाव, हिंगणी, गुळपोळी या भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा आहेत. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवर दाऊनी रोगाचा प्रसार होऊ शकतो यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील सर्वत्र कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.