अवकाळी पावसाचा मेंढ्यांना मोठा फटका; ४० पेक्षा जास्त मेंढरे गारठून दगावली

अचानक हजेरी लावलेल्या पावसात खटाव येथील हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. या शिवारात अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे व हवेतील गारठ्यामुळे तब्बल चाळीसपेक्षा अधिक मेंढरे गारठून ठार झाली.

    वडूज : अचानक हजेरी लावलेल्या पावसात (Unseasonal Rains) खटाव येथील हुसेनपूर शिवारात रामचंद्र चव्हाण या मेंढपाळाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. या शिवारात अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे व हवेतील गारठ्यामुळे तब्बल चाळीसपेक्षा अधिक मेंढरे गारठून ठार झाली.

    या दुर्घटनेमुळे इतर मेंढपाळांत देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणी (ता. खटाव) येथील प्रगतशील शेतकरी श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शिवारात खटाव येथील मेंढपाळ रामचंद्र चव्हाण व त्यांचे स्वरूपखानवाडी येथील मावस भाऊ यांनी गेली सहा दिवसापासून मेंढरं बसवली होती. मेंढ्याचे खत शेतासाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांचा कल शेतामध्ये मेंढ्या बसविण्याकडे अधिक असतो.

    रात्रीच्यावेळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मेंढरं सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली. वीज, वारा, पाऊस व किर्रअंधार असल्याने व चिखल झाल्याने व मनुष्यबळाच्या अभावामुळे तसेच निसर्गाच्या लहरीपणा पुढे त्यांचे काहीच चालले नाही. येथील मेंढपाळ चव्हाण यांच्या तब्बल चाळीस मेंढ्या गारठून मृत्यूमुखी पडल्या.

    लोणी (ता. खटाव) येथील श्रीमंत शिंदे यांच्या हुसेनपूर येथील शेतात चव्हाण व त्यांचा मावस भाऊ यांनी गेली सहा दिवस मेंढरं बसवली होती. एवढ्या मोठ्या पावसाची कसलीच कल्पना नसताना अचानक रात्रीच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मेंढरं सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. मेंढरे देखील आपला जीव वाचवण्यासाठी सैरभैर इकडे तिकडे धावत होती. शेत नांगरलेले असल्याने मेंढरं चिखलातच रूतून बसत होती.

    काही मेंढ्या जीव वाचवण्यासाठी शेजारील ऊसाच्या शेतात घुसल्या व तेथेच मृत्यृमुखी पडल्या. मेंढपाळांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रभर शर्थीने खिंड लढवली. पण तीनशेपैकी चाळीस मेंढ्यांना प्राण गमवावे लागले. काही मेंढ्या अत्यावस्थ स्थितीत आहेत. एकदम ४० मेंढरं दगवल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे.

    घटनास्थळी शासनाने प्रतिनिधी डॉ.नितीन खाडे, डॉ. प्रकाश बोराटे, डॉ.विक्रम मोरे, मंडल अधिकारी एम. बी. मोहिते, तलाठी बी. डी. गायकवाड यांनी पंचनामा केला. यावेळी लोणी येथील ज्ञानेश्वर शिंदे, खटाव येथील शिवसेना नेते अमिन आगा, गिरीश शिर्के, किरण देशमुख घटनास्थळी उपस्थित होते. शासन स्तरावरून त्वरित भरपाई मिळावी, अशी मागणी‌ पीडित चव्हाण परिवाराकडून केली जात आहे.