पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुराव घोलप महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम फलकाचे अनावरण

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रम फलकाचे अनावरण झाले. या नाविन्यपूर्ण उपक्रमात बाबुरावजी घोलप महाविद्यालय सुरुवातीपासूनच सक्रियरित्या सहभागी झालेले आहे.

  पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी महाविद्यालयात करियर कट्टा उपक्रम फलकाचे अनावरण झाले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या करिअर कट्टा या नाविन्यपूर्ण उपक्रमात बाबुरावजी घोलप महाविद्यालय सुरुवातीपासूनच सक्रियरित्या सहभागी झालेले आहे.

  दरम्यान करिअर कट्टा अंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात. महाविद्यालयातील करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षा विभाग अंतर्गत करियर कट्टा उपक्रम फलकाचे अनावरण कार्यक्रम बुधवार दिनांक 29 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आला.

  या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा करिअर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. राणी शितोळे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या उपस्थितीत, डॉ. राणी शितोळे यांच्या हस्ते करियर कट्टा उपक्रम फलकाचे अनावरण करण्यात आले.

  याप्रसंगी डॉ. राणी शितोळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना करिअर घडवण्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उद्योजकता विकास आणि कौशल्य विकास असे तीन पर्याय शासनाने उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना वृत्तवेध तसेच संविधानाचे पारायण या करिअर कट्टा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणे कसे महत्त्वाचे आहे हे त्यांनी स्पष्ट केले.

  त्याचप्रमाणे करिअर कट्ट्याअंतर्गत महाराष्ट्र शासन 15 हजार विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटी कोर्स मोफत उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कोर्ससाठी इतरत्र साधारणपणे अडीच ते तीन लाख रुपये फी आकारली जाते मात्र हाच कोर्स करियर कट्ट्याचे रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे डॉ. राणी शितोळे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. शासनाच्या प्री आयएस ट्रेनिंग संदर्भातही त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे सर यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करियर कट्टा उपक्रमात रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन केले.

  या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना त्यांचे करियर घडवण्यासाठी निश्चितच लाभ होईल, असे खात्रीपूर्वक त्यांनी सांगितले. महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. क्रांती बोरावके यांनी करियर कट्टा उपक्रमाअंतर्गत महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. तसेच करियर कट्टा उपक्रमाची उद्दिष्टे नमूद केली. खाजगी क्लासमध्ये ज्या मार्गदर्शनासाठी लाखात फी घेतली जाते ते मार्गदर्शन प्रतिदिन एक रुपयात विद्यार्थ्यांना करिअर कट्टा या उपक्रमाने उपलब्ध करून दिले असल्याचा उल्लेख आवर्जून आपल्या प्रास्ताविकात डॉ. क्रांती बोरावके यांनी केला.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिपाली चिंचवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुषमा सोनार यांनी केले. उद्योजकता आणि कौशल्य विकास समन्वयक डॉ नरसिंग गिरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गोरक्ष ढेरे, डॉ. विजय बालघरे, प्रा. डॉ. सविता वासुंदे, प्रा.आर आर मोरे, संतोष सास्तुरकर, प्रा. अरबाज शेख, तसेच श्री सनी पावले, विरेन चव्हाण, सचिन शितोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. धनश्री कुलकर्णी,प्रा. दिपाली जोशी, प्रा. रसाळे उपस्थित होते.