इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही काळाची गरज : पृथ्वीराज चव्हाण

स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicle) वापरणे ही काळाची गरज असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले.

    कराड : स्वच्छ पर्यावरणासाठी पुढील काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicle) वापरणे ही काळाची गरज असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सांगितले. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त सौर ऊर्जा व ई-वाहन प्रदर्शनाचे आयोजन मलकापूर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले होते. या सप्ताहाचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ऑटो इंडस्ट्रीमध्ये आज झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीच्या काही कंपन्यांनी भारतात आपले जाळे मजबूत केले आहे. या मोटारसायकलींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढले आहे. कार उत्पादनाची गरज लक्षात घेता त्याचीसुद्धा उत्पादन वाढ भविष्यात होईल. भविष्यात नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या वाहनाचा वापर करणे पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.

    दरम्यान, चव्हाण यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली. तसेच त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादन खर्च व कालावधी, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, चार्जिंग कालावधी याची माहिती घेतली. तसेच वाहनांच्या विक्री पश्चात सर्व्हिसचा सुद्धा विचार महत्वाचा असल्याचे त्यांनी इलेक्ट्रिक वाहन डिस्ट्रिब्युटर यांना सांगितले.