जिल्ह्यातील ३१ लाख ४५ हजार नागरिकांचे लसीकरण : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेस सुरुवात झालेली असून दिनांक 22 नोव्हेंबर 2021 अखेरपर्यंत एकूण 31 लाख 45 हजार 114 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिमेस (Vaccination in Solapur) सुरुवात झालेली असून, 22 नोव्हेंबर 2021 अखेरपर्यंत एकूण 31 लाख 45 हजार 114 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 23 लाख 55 हजार 640 तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7 लाख 89 हजार 474 इतकी आहे. तरी जिल्ह्यातील उर्वरित सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन स्वतःचे लसीकरण करून घ्यावे व आपला जिल्हा 100 टक्के लसीकरण झालेला जिल्हा होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

    जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तर कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबरोबरच कोरोना व्हायरसपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

    जिल्ह्याच्या 100 टक्के लसीकरणासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा प्रशासन कामकाज करत असून सोलापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद त्यांच्या अधिनस्त येणाऱ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवत आहेत. तरी सर्व संबंधित नागरिकांनी सहकार्य करावे व लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. जोपर्यंत प्रत्येक नागरिकांचे लसीकरण होणार नाही तोपर्यंत कोविड महामारी पासून मुक्ती मिळणार नाही. तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.

    सोलापूर जिल्ह्याला 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचे एकूण 34 लाख 14 हजार 400 इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये सोलापूर शहर 7 लाख 34 हजार 383 तर सोलापूर ग्रामीण 26 लाख 80 हजार 17 इतके नागरिकांचे लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्या अनुषंगाने दिनांक 22 नोव्हेंबर 2021 अखेरपर्यंत एकूण 31 लाख 45 हजार 114 नागरिकांना पहिला व दुसरा डोस देण्यात देण्यात आलेला असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 23 लाख 55 हजार 640(69%)तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 7लाख 89 हजार 474(23.1%)इतकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

    ग्रामीण भागातील 18 लाख 70 हजार 744 नागरिकांनी पहिला तर 5 लाख 47 हजार 182 नागरिकांनी दुसरा असे एकूण 24 लाख 17 हजार 926 ग्रामीण नागरिकांनी लस घेतलेली आहे. तर शहरी भागातील 4 लाख 84 हजार 881 नागरिकांनी पहिला तर 2 लाख 42 हजार 292 नागरिकांनी दुसरा असे एकूण 7 लाख 27 हजार 188 नागरिकांनी लस घेतलेली पासून ग्रामीण व शहरी मिळवून पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 69 टक्के तर दुसरा डोस घेतले नागरिकांची टक्केवारी 23.1 इतकी असल्याची माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.

    लसीकरण कामकाज :

    1) हेल्थकेअर वर्कर:- पहिला डोस-42 हजार 342, दुसरा डोसब- 37 हजार 612.

    2) फ्रन्टलाइन वर्कर:- पहिला डोस 79 हजार 125, दुसरा डोस 68 हजार 894.

    3) 45 ते 59 वर्षे वयोगट:- पहिला डोस 5लाख 51 हजार 171, दुसरा डोस 2 लाख 39 हजार 498

    4) 60 वर्षावरील:- पहिला डोस 2 लाख 32 हजार 164, दुसरा डोस 2 लाख 16 हजार 03

    5) 45 वर्षावरील एकूण:- पहिला डोस 9 लाख 83 हजार 335, दुसरा डोस 4 लाख 41 हजार 101

    6) 18 ते 44 वर्षे वयोगट:- पहिला डोस 12 लाख 50 हजार 838, दुसरा डोस 2 लाख 41 हजार 837

    एकूण लसीकरण- पहिला डोस 23 लाख 55 हजार 640, दुसरा डोस 7 लाख 89 हजार 474.

    लस उपलब्धता :

    दिनांक 22 नोव्हेंबर 2021 अखेरपर्यंत एकूण 32 लाख 12 हजार 510 लसीच्या मात्र उपलब्ध होत्या. त्यामध्ये कोव्हीशिल्ड 30 लाख 84 हजार 430 तर कोवक्सिन 1 लाख 28 हजार 80 मात्रा उपलब्ध झाले असून, एकूण प्राप्त लसीच्या मात्रापैकी 28 लाख 86 हजार 630 कोव्हीशिल्डच्या मात्रा तर 1 लाख 15 हजार 460 इतक्या कोव्हॅक्सिन मात्राचे वितरण करण्यात आलेले असून आज अखेरपर्यंत एकूण दोन लाख दहा हजार चारशे वीस लस मात्रा शिल्लक असून, त्यामध्ये 9 लाख 97 हजार 800 मात्रा कोव्हीशिल्ड तर 12 हजार 620 कोव्हॅक्सिनच्या मात्रा शिल्लक आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीनेेे देण्यात आली. तर लस वेस्टचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याचेही सांगण्यात आले.