वरवरा राव यांची प्रकृती स्थिर; रुग्णालय प्रशासनाची उच्च न्यायालयात माहिती

भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि अंतरिम जामिनावर असलेल्या (८२) वर्षीय ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव यांचा आरोग्याविषयीचा लेखी वैद्यकीय सारांश नानावटी रुग्णालयाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.

    मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आणि अंतरिम जामिनावर असलेल्या (८२) वर्षीय ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव (Varavara Rao) यांचा आरोग्याविषयीचा लेखी वैद्यकीय सारांश नानावटी रुग्णालयाने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. राव यांची प्रकृती उत्तम असून, ते दैनंदिन जीवनातील कामे करण्यास सक्षम असल्याचे रुग्णालयाने सांगितले.

    पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेचा भीमा कोरोगाव प्रकरणी संबंध जोडत पोलिसांनी कवी वरवरा राव यांना २०१८ मध्ये अटक केली. तेव्हापासून राव तळोजा कारागृहात असून, राव यांना वैद्यकिय कारणास्तव उच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात सशर्त जामीन मंजूर केला. तसेच अंतरिम जामिनाचा कालावधी संपण्यापूर्वी त्यांनी शरणागती पत्कारण्याचे निर्देश दिले. ही मुदत संपल्याने राव यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अ‍ॅड. आनंद ग्रोव्हर व अ‍ॅड. आर सत्यनारायनन यांनी मुदतवाढीसाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर शुक्रवारी न्या. नितीन जामदार आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. न्यायालयाने मागील सुनाणीदरम्यान, नानावटी रुग्णालयाला वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला होता.

    त्यावर शुक्रवारी, राव यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांनी तुरुंग प्रशासनाला शरण यावे, अशी मागणी एनआयएतर्फे ऍड. संदेश पाटील यांनी केली. राव यांचा लेखी वैद्यकीय सारांश डॉ. हर्षद लिमये आणि डॉ. अनिल व्यंकिटाचलम, न्यूरोलॉजिस्ट यांच्यामार्फत खंडपीठासमोर सादर करण्यात आला. त्यानुसार, झोप न लागणे आणि थोडा थकवा यांसारखी किरकोळ लक्षणे रावमध्ये दिसून येत आहेत. तथापि, हृदयरोगतज्ज्ञांनी रक्तदाब थोडा जास्त असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित औषधांची मात्रा वाढवली आहे. उर्वरित तपासणीमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण बदल दिसून येत नाही. अलीकडेच त्यांनी हर्नियावर उपचार घेतल्यामुळे ओटीपोटात पट्टा बांधला असून त्यासंदर्भात ते दुसऱ्या रुग्णालयातून त्यांची वेळोवेळी देखरेख घेतली जात आहे.

    राव यांचे कार्डियाक, ईएनटी, मानसोपचार, यूरोलॉजिकल आणि न्यूरोलॉजिकल मूल्यांकन केले असून त्यांची नियमित औषधे चालू ठेवण्यास सांगितले आहे. त्यांची डोकेदुखी पूर्णपणे दूर झाली आहे. त्यावर रुग्णालय प्रशासनाने सादर केलेला सारांश अपुरा असून, त्यांचा संपूर्ण वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर होणे आवश्यक आहे. त्यांना अन्य अनेक लहान मोठ्या व्याधी आहेत, असे राव यांच्या वतीने ऍड. आनंद ग्रोव्हर यांनी सांगितले. त्याची दखल घेत खंडपीठाने नानावटी रुग्णालयाला राव यांचा मूळ वैद्यकीय अहवाल सोमवारी सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी २० डिसेंबरला निश्चित केली.