सातारा जिल्ह्यात वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने साजरी ; पतीच्या उदंड आयुष्यासाठी सुवासिनींचे साकडे

सोमवारी सातारा जिल्ह्यात पारंपारिक पध्दतीने वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली . साताराशहर व परिसरात हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवून जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे, अशी प्रार्थना करून वटवृक्षाची पूजा करत वटपौर्णिमेचा सण साजरा केला.

    सातारा : सोमवारी सातारा जिल्ह्यात पारंपारिक पध्दतीने वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली . साताराशहर व परिसरात हिंदू संस्कृतीनुसार महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवून जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे, अशी प्रार्थना करून वटवृक्षाची पूजा करत वटपौर्णिमेचा सण साजरा केला. फळ बाजारात या निमित्ताने मोठी उलाढाल झाली .

    सावित्रीने यमाकडून पतीचे प्राण आणल्याची पुराणात कथा आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळाले, ही या वटपौर्णिमा व्रत करण्यामागील श्रद्धा आहे. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते

    सकाळपासूनच सातारा शहरात वडाची पूजा करण्यासाठी हळद-कुंकू, ओटी, बांगडी, वस्त्रमाळ, आंबे, वस्त्र आदी वस्तू खरेदीसाठी महिलांची गर्दी दिसत होती. हिरवा शालू, पैठणी, नाकात नथ, हिरवा चुडा, सिंदूर अशी सौभाग्य लेण्यांनी सजून महिलांनी वटवृक्षाची पूजा करुन वडाला फेरे घालताना पतीला आरोग्यसंपन्न, दीर्घायुष्य लाभू दे, अशी प्रार्थना केली. गोडोली, महादरे , मोरे कॉलनी भुरके कॉलनी, पोलीस मुख्यालय परिसर , प्रतापगंज पेठ, मंगळाई कॉलनी, जगतापवाडी, पिरवाडी , निसर्ग कॉलनी इ भागांमध्ये वडाला फेऱ्या मारून सुवासिनींनी आपल्या साता जन्माच्या मनोकामना प्रकट केल्या .करोना चा संसर्ग दर उतरल्याने सुवासिनींचा उत्साह पहायला मिळाला . सुवासिनींनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून हा सण साजरा केला. अनेक महिलांनी यंदा घरीच हा सण साजरा केला. फळ बाजारात मंगळवारी मोठी उलाढाल झाली .

    सातारा शहर व परिसरात ग्रामीण भागात आज दुपारपासूनच सुवासिनी वडाची पूजा करण्यासाठी जात होत्या. सातारा येथे पोलीस मुख्यालयातील महिला कर्मचार्‍यांनी पोलीस वसाहतीत असलेल्या वडाच्या झाडाला फेर्‍या मारुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.