भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना सरडेवाडीसह पाटस टोलनाक्यावर मिळणार टोलमध्ये सूट

  पाटस : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या सर्व वाहनांना ३१ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी आणि दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर टोलमध्ये सूट देण्यात येणार असून, त्या वाहनांना टोल आकारण्यात येणार नाही. ही माहिती टोल वसुली कंपनीचे व्यवस्थापक नितीन शिंदे यांनी दिली.

  राज्यातील विविध संघटनांनी राज्य शासनाकडे केली मागणी

  पुणे जिल्ह्यात पुणे-अहमदनगर महामार्गालगत असलेल्या भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक विजयस्तंभाला १ जानेवारी रोजी दरवर्षी राज्यातून विविध भागांतून मोठ्या संख्येने भीम अनुयायी मानवंदना देण्यासाठी येत असतात. यंदा ही या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यातून लाखो भीम अनुयायी दाखल होणार आहेत. या ठिकाणी येणाऱ्या भीम अनुयायीयांच्या वाहनांसाठी काही टोल नाक्यावर टोल आकारण्यावरून वाद-विवाद होण्याच्या घटना घडतात. या वाहनांना टोल आकारण्यात येऊ नये, त्यांना टोल मध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी राज्यातील विविध संघटनांनी राज्य शासनाकडे केली आहे.

  राज्यातील अनेक भागांतून भीम अनुयायी विजयस्तंभाला देतात भेट 

  त्यानुसार पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी व दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कर्नाटक राज्य, सोलापूर, धाराशिव, कोल्हापूर, लातूर आदी भागातून अनेक भीम अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने जात असतात, त्यामुळे या येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा टोल आकारू नये, अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, युवा भिम सेना संघटनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

  त्यानुसार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्रशासनाने ३१ डिसेंबर २०२३ सकाळ पासून व २ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळ पर्यंत महामार्गावरुन ये – जा करणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा टोल आकारण्यात येणार नाही. या वाहनांना टोल प्रशासनाकडून सहकार्य केले जाणार असून भीम अनुयायांनीही टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची वाद-विवाद न घालता टोल प्रशासनाला सहकार्य करावे , असे आवाहन पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग टोल वसुली कंपनीचे व्यवस्थापक नितीन शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, दौंड तालुका युवा भिमसेना संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी शिंदे यांनी ही माहिती दिली.