पिडित महिला तसेच वेश्या व्यवसायातील महिलांनाही मिळणार शिधापत्रिका : छगन भुजबळ

वेश्या व्यवसाय, बालवेश्या व वेश्यांचा मुलांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या सल्लागार समितीच्या सुचनेनुसार वेश्या, बालवेश्या व वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन होण्यासाठी त्यांना शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करण्याचे शासनाच्या विचाराधिन होते. त्यानुशंगाने शासनाने निर्णय घेऊन याबाबत शासननिर्णय देखील निर्गमीत करण्यात आलेला आहे.

    मुंबई : अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमातंर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडित महिलांना तसेच वेश्या व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणा-या महिलांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

    वेश्या व्यवसाय, बालवेश्या व वेश्यांचा मुलांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेल्या सल्लागार समितीच्या सुचनेनुसार वेश्या, बालवेश्या व वेश्यांच्या मुलांचे पुनर्वसन होण्यासाठी त्यांना शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करण्याचे शासनाच्या विचाराधिन होते. त्यानुशंगाने शासनाने निर्णय घेऊन याबाबत शासननिर्णय देखील निर्गमीत करण्यात आलेला आहे.

    या निर्णयानुसार राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्याकडे असणा-या यादीतील स्वंयसेवी संस्थाकडून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडीत महिला व वेश्या व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना शिधापत्रिका देण्यात येणार आहे. नवीन शिधापत्रिकेसाठी आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपुर्वक विचार करून ओळखीचा पुरावा व वास्तव्याचा पुरावा सादर करण्यापासून त्यांना सूट देण्यात येत आहे. या कागदपत्रांची संबधितांकडून मागणी देखील करण्यात येवू नये असे या शासन निर्णयात देखील नमूद करण्यात आले आहे.

    राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व राज्य एड्स नियंत्रण संस्था यांचेकडील यादीतील महिलांकडून नवीन शिधापत्रिकासाठी अर्ज भरून घेऊन त्यांना शिधापत्रिका वितरण करण्याची कार्यवाही संबंधित संस्था व महिला व बालविकास विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात येणार असून व शिधापत्रिका केवळ भारतीय नागरीकांना वितरीत होईल याची काटेकोरपणे दक्षता घेण्याबाबत संबधित कार्यान्वयीन यंत्रणानी दक्षता घ्यावी असे देखील निर्देश देण्यात आले आहेत.