धारशिववरुन उठलं वादळ, उस्मानाबादेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; 7 जण जखमी

याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली असून २५ ते ३० जणांच्या विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    उस्मानाबाद : नामांतरावरून सोशल मीडियावर पोस्ट केली व पानटपरी बंद कर, असा दम दिल्याच्या कारणावरून तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे दोन गटांत भीषण हाणामारी झाली. यात सात जण जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली असून २५ ते ३० जणांच्या विरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेदरम्यान काटगाव येथील जैनुद्दीन मुजावर हा मशाक शेख यांच्या पानटपरीवर काम करत होता. या वेळी आरोपींनी जैनुद्दीन मुजावर याला पानटपरी बंद कर म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण केली. जैनुद्दीन हा पळत घराकडे आला. यातील आराेपींनी घरात घुसून लोखंडी कत्तीने डोक्यात व हाताला मारून गंभीर जखमी केले. तसेच तमिज मुजावर याच्या तोंडावर, उजव्या पायावर व हातावर लोखंडी रॉडने मारून जखमी केले. तसेच आई सुलतानबी यांनाही मारहाण झाली. हाफिज समीर मुजावर यांच्या तक्रारीवरून बसू पांचाळ, अमर वरदे, अप्पू शिंदे, बालाजी चौधरी, संकेत खोबरे, राहुल नकाते, सुशांत पाटील, गणेश भोज, विशाल मुळे, अविनाश वरदे यांच्यासह इतर पाच ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या गटानेही तक्रार दिली आहे. यात काटगाव येथील मशाक मशाक फत्तू गवंडी याने वादग्रस्त पाेस्ट टाकली होती. याचा जाब विचारला असता आराेपीने शिवीगाळ करून तलवारीने मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे.