जिल्हा परिषद सभापतीचा सभात्याग; भ्रष्ट कारभाराला पाठबळचा आरोप

जिल्हा परिषद विभागप्रमुखांच्या बेशिस्त वर्तनामुळे अर्थ समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी सभात्याग केला. अर्थ समितीची सभा सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी घेण्यात येणार होती. सभा अडीच वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झाली.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषद विभागप्रमुखांच्या बेशिस्त वर्तनामुळे अर्थ समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी सभात्याग केला. अर्थ समितीची सभा सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी घेण्यात येणार होती. सभा अडीच वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झाली. यावेळी ज्येष्ठ सदस्य भारत शिंदे, ऍडव्होकेट सचिन देशमुख यांच्यासह इतर सदस्य बैठकीला उपस्थित होते. मात्र, यावेळी अर्थ समितीची सभा असतानाही केवळ तीन विभाग प्रमुख उपस्थित असल्याने वैतागलेल्या सभापती विजयराज डोंगरे आणि इतर सदस्यांनी सभात्याग केला.

    यापूर्वीही अर्थ समितीच्या सभेला विभागप्रमुखांची दांडी असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सभापती विजयराज डोंगरे यांनी आपल्या केबिनमध्ये सर्व सदस्यांना नेले. त्याठिकाणी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला.
    सभापती विजयराज डोंगरे म्हणाले, अर्थ समितीची सभा यापूर्वीही अशीच विभागप्रमुखांच्या कमी उपस्थितीमुळे तहकूब करण्यात आली. आता महत्त्वाची सभा असताना ही नऊ विभागप्रमुखांनी दांड्या मारल्या. यावरून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रशासनावर लक्ष नसल्याचा आरोप केला.

    भारत शिंदे म्हणाले, जिल्हा परिषद भ्रष्टाचाराने बजबजली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाऐवजी अनेक अधिकारी बाहेर कार्यालय थाटून बसले आहेत. त्यामध्ये आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव यांचा समावेश आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार अनुकंपाच्या एका फाईलसाठी सही करायला दोन लाख रुपये लाच मागतात त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रशासन प्रमुख म्हणून दिलीप स्वामी यांची जबाबदारी नाही का? असा थेट शिंदे यांनी सवाल केला..

    दरम्यान, या सर्व घडामोडीवर सभापती विजयराज डोंगरे यांचासह सदस्यांचे शिष्ट मंडळ सीईओ दिलीप स्वामी यांच्यासमोर कैफियत मांडली. यावेळी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.