गाझामध्ये युद्धविराम; 50 ओलिसांच्या सुटकेसाठी सरसावले इस्रायल

इस्रायलच्या मंत्रिमंडळाने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या 50 जणांची सुटका करण्यासाठी हमाससोबतच्या कराराला मंजुरी दिली आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमाससोबतच्या 4 दिवसांच्या युद्धविरामाला मान्यता दिली आहे.

    तेल अवीव : इस्रायलच्या मंत्रिमंडळाने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या 50 जणांची सुटका करण्यासाठी हमाससोबतच्या (Israel-Hamas War) कराराला मंजुरी दिली आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमाससोबतच्या 4 दिवसांच्या युद्धविरामाला मान्यता दिली आहे. यामुळे 50 ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे.

    चार दिवसांच्या युद्धविरामादरम्यान ओलिसांची सुटका केली जाईल, असे इस्त्रायली पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या करारानुसार, प्रत्येक अतिरिक्त 10 ओलिसांची सुटका केल्यास युद्धविरामाचा कालावधी एका दिवसाने वाढवला जाईल.

    बुधवारी पहाटे झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर इस्त्रायलच्या मंत्रिमंडळाने या कराराला मंजुरी दिली. या बैठकीपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, ओलिसांच्या सुटकेबाबत समझोता झाला तरीही युद्ध सुरूच राहील.