
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांच्यात चांदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी आले असताना तासभर झालेल्या भेट प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. असे असताना आज पुन्हा एकदा सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातही चांदीवाल आयोगाच्या कार्यालयाबाहेर एकाच खोलीत दहा मिनिटे चर्चा झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे चांदिवाल आयोगाच्या चौकशीच्या निमित्ताने स्वत:च्या सापळ्यात अडकलेल्या परमबीरसिंह, देशमुख आणि वाझे यांच्या भेटीगाठींतून नेमके काय सुरू आहे याबाबतच्या चर्चा आणि तर्क कुतर्काना उधाण आले आहे.
देशमुख – वाझे यांच्यात दहा मिनिटे चर्चा
काल (दि.२९) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यानी चांदीवाल आयोगासमोर हजर राहात देशमुख यांच्या विरोधात आरोप प्रकरणात माघार घेत असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आयोगाच्या सुनावणीला जाताना सिंह आणि सचिन वाझे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची बाब समोर आली होती. यावेळी दोघांमध्ये काय बोलणे झाले त्याचा तपशील मात्र उपलब्ध होत नसला तरी वाझें- परमबीर यांच्या भेटीवर अनिल देशमुखांच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आज अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात बंद दाराआड दहा मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वाझेंना हजर करण्यासाठी घेऊन जाणा-या पथकाचीही चौकशी
दरम्यान, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीची चौकशी मुंबई पोलीस करणार आहे. मुंबई पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना भेटीसाठी अधिकृत परवानगी होती की, नाही? याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. जर अशी अधिकृत परवानगी नसेल तर या दोघांची भेट कशी झाली? याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. तसेच यासंदर्भात सचिन वाझेंना चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यासाठी घेऊन येणाऱ्या पथकाचीही चौकशी केली जाईल. दरम्यान, या तिघांमधील भेटीगाठीच्या सत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. परवानगीविना या भेटीगाठीच्या सत्रांमागे नक्कीच काहीतरी नव्या गोष्टी शिजत असल्याचा तर्क समूह माध्यमांतून व्यक्त केला जात आहे.
भेटीगाठीच्या चौकशीचे आदेश
दरम्यान या भेटीगाठीची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच परमबीर सिंह ज्या गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचे आहे, याप्रकरणीही चौकशी करण्यात येणार असल्याचे दिलीप वळसे पाटील यानी म्हटले आहे.