पुढील 2 दिवस राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता; 7 जिल्ह्यांत High Alert

हवामान खात्याने उद्या अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर गोंदिया, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या चोवीस तासांत संबंधित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

    नागपूर (Nagpur) : उत्तर भारतात थंडीची लाट (Cold wave) ओसरल्यापासून राज्यात देखील किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ (temperature rise in maharashtra) झाली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिटीची (rain and hailstorm with lightning) शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 28 आणि 29 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    हवामान खात्याने उद्या अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर गोंदिया, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या चोवीस तासांत संबंधित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आकाशात विजा चमकत असताना मोठ्या झाड्याच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञाकडून देण्यात आला आहे.

    याशिवाय उद्या नाशिक, जळगाव, धुळे, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत अंशत: ढगाळ हवामान राहणार आहे. संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. बुधवारी नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर गडचिरोली येथे येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.

    उत्तर भारतातील पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे 27 आणि 28 डिसेंबर रोजी उत्तर-पश्चिम हिमालयीन प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किम राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 28 आणि 29 डिसेंबर पूर्व मध्यप्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. त्याच बरोबर येत्या 2 दिवसांनंतर मध्य व पूर्व भारतात 2 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरण्याची शक्यता आहे.