पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून बावनकुळेंचे मोठे विधान; जे ठरलं होतं तेच केले, अजित पवार झाले पालकमंत्री

    मुंबई : महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाली आहेत. पुण्याचे पालकमंत्रीपद चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, आजअखेर त्याचा तिढाही सुटला. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजपनेते चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडे पुण्याचा कारभार देण्यात आला आहे. अजित पवार यांच्या नाराजीमुळे त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद दिल्याची चर्चा आहे. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा

    बावनकुळे म्हणाले की, पालकमंत्री बदलणे हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. जे ठरलं होत तेच झालं आहे. अजित पवार कधीही नाराज नव्हते. ते स्पष्टवक्ते आहेत. हे पहिलचं ठरल होतं, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बनणार आहेत. काँग्रेस पक्षावर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या रक्तात कन्फ्युज करण्याचे राजकारण आहे. काँग्रेसमध्ये ब्लड कॅन्सर आहे.

    तर आम्ही देशातील हिंदू संस्कृती नष्ट करू

    एमके स्टॅलिन यांच्या हिंदू संस्कृतीबाबतच्या भूमिकेवर बावनकुळे म्हणाले की, स्टॅलिन यांनी जाहीर केलं की देशात आमचं सरकार आलं तर आम्ही देशातील हिंदू संस्कृती नष्ट करून टाकू. मला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांना प्रश्न विचारायचे की, हिंदू संस्कृती संपवू म्हणणारे घटक पक्ष तुम्हाला मान्य आहे का? मान्य नसेल तर युती तोडावी, असही बावनकुळे यांनी म्हटलं.