महेंद्रसिंह धोनीने सांगितले निवृत्तीचे गुपित; जेव्हा जेव्हा हमसून हमसून रडलो होतो, तेव्हाच निवृत्त झालो

MS Dhoni Statment on Retirement : 5 ऑगस्टला धोनीने केवळ औपचारिक घोषणा केली. त्यापूर्वीच धोनीने आपल्या निवृत्तीचा निर्णय घेतला होता, असे स्वतः धोनीने एका कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे.

  5 ऑगस्ट 2022… हा दिवस भारतातील क्रीडा रसिकांसाठी अतीव दुःखाचा दिवस, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं कारण म्हणजे, याच दिवशी सर्वांचा लाडका आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

  लाडक्या धोनीची सोशल मीडियावर पोस्ट

  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या धमाकेदार कारकिर्दीनंतर चाहत्यांच्या लाडक्या धोनीनं सोशल मीडियावर पोस्ट करीत आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. अनेकांना आपले अश्रू आवरणंही कठीण झाले होते. पण, 5 ऑगस्टला धोनीने केवळ औपचारिक घोषणा केली, त्यापूर्वीच धोनीने आपल्या निवृत्तीचा निर्णय घेतला होता. एका कार्यक्रमात स्वतः धोनीने यासंदर्भात माहिती दिली असून, सध्या धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

  धोनीनं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला 
  2019 च्या विश्वचषकादरम्यान धोनीनं शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आता 3 वर्षांनंतर धोनीनं स्वतःच हे गुपित उघड केलं आहे. धोनीनं नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. 2019 च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतरच मी स्वत: निवृत्ती घेतली होती.

  धोनी मोक्याच्या क्षणी धावबाद झाला अन् विश्वचषकापासून दूर

  2019 च्या विश्वचषकाच्या सामन्यात धोनी मोक्याच्या क्षणी धावबाद झाला आणि भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेतील हा सेमीफायनलचा सामना होता. धोनी रनआऊट झाल्यानं कोट्यवधी भारतीय हिरमूसले होते. धोनी स्वतःही हमसून हमसून रडला होता.

  3 वर्षांनी धोनीचा मोठा खुलासा
  सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या निवृत्तीबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये धोनी म्हणतोय की, जेव्हा तुम्ही जवळचा सामना गमावता, तेव्हा भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. माझ्यासाठी तो टीम इंडियासाठी खेळण्याचा शेवटचा दिवस होता. मी वर्षभरानंतर निवृत्ती घेतली, पण खरं तर त्याच दिवशी मी निवृत्ती घेतलेली हे सत्य आहे. पण मला त्यावेळी निवृत्तीची घोषणा करायची नव्हती.

  आजही भारतीय क्रिकेट फॅन्सच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ‘तो’ सामना
  न्यूझीलंडनं दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेट संघाची अवस्था फारच बिकट झाली होती. टीम इंडियाचे आघाडीचे तीन फलंदाज फक्त पाच धावांच्या आत तंबूत परतले. 24 धावांवर चार विकेट गेल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाचा पराभव होणार, असंच वाटलं. पण एमएस धोनी आणि रवींद्र जाडेजा यांनी बाजी पलटवली होती. दोघांनीही एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत टीम इंडियाच्या विजायाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. पण या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. रवींद्र जाडेजानं 59 चेंडूत 77 धावांची खेळी केली होती. या खेळीत जाडेजानं 4 षटकार आणि 4 चौकार लगावले होते. माजी कर्णधार एमएस धोनीनं 72 चेंडूत संयमी 50 धावांचे योगदान दिलं होतं. मोक्याच्या क्षणी धोनी धावबाद झाला अन् लाखो भारतीयांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. 2019 च्या विश्वचषकात टीम इंडियाच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. न्यूझीलंडच्या मॅट हेनरी यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या होत्या. ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या होत्या. लॉकी फर्गुसन आणि जिमी नीशम यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.