स्कूटरवरुन जाताना तरुणीचा गळा मांज्यात अडकला, ती तडफडत होती, बघे फक्त तमाशा बघत होते

उज्जैनमध्ये २० वर्षांच्या तरुणीचा जीव चायनिज मांज्याने घेतला आहे. ही मुलगी आपल्या मामे बहिणीला घेऊन स्कूटरवरुन जात होती, एका पुलावर वेगात असलेल्या या तरुणीचा गळा मांज्यात अडकला, आणि त्यानंतर तिचा गळा या मांज्यामुळे चिरला गेला. घटनास्थळीच या प्रकाराने तिचा मृत्यू झाला आहे.

  उज्जैन : उज्जैनमध्ये २० वर्षांच्या तरुणीचा जीव चायनिज मांज्याने घेतला आहे. ही मुलगी आपल्या मामे बहिणीला घेऊन स्कूटरवरुन जात होती, एका पुलावर वेगात असलेल्या या तरुणीचा गळा मांज्यात अडकला, आणि त्यानंतर तिचा गळा या मांज्यामुळे चिरला गेला. घटनास्थळीच या प्रकाराने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी केवळ गुन्हा दाखल केला आहे.

  मामाच्या घरी अभ्यासाला आली होती

  या २० वर्षीय तरुण विद्यार्थिनीचे नाव नेहा आंजना उमेश सिंह असे आहे. ती महिदपूर तालुक्यात नारायणा गावातील रहिवासी होती. सध्या ती उज्जैनमध्ये मामाच्या घरी अभ्यासासाठी आली होती. नेहा आपल्या मामे बहिणीला घेऊन फ्री गंज परिसरात जाण्यासाठी घरातून निघाली होती.

  या अपघातात नेहाची मामे बहीणही जखमी झाली आहे. तिच्या मामेबहीणीने दिलेल्या जबाबानुसार, नेहाचा गळा चायनिज मांज्याने कापल्यानंतर, ती रस्त्यावर तडफडत पडली होती. तिच्या गळ्यातून रक्तस्राव होत होता. त्यावेळी आजूबाजूने अनेक वाहने गेली, अनेक जण बघ्यांच्या भूमिकेत होते, पण यातील कुणीही त्यांच्या मदतीसाठी आले नाही. थोड्या वेळानंतर तिथून जात असलेले वकील रवींद्र सिंग सेंगर यांनी त्यांची मदत केली. सेंगर यांनी तडफत असलेल्या नेहाला गाडीत बसवून हॉस्पिटलमध्ये नेले, पण वाटेतच तिचा मृत्यू झाला होता.

  यानंतर नेहाच्या इतर नातेवाईंकांना याची माहिती देण्यात आली, या प्रकरणी माधवनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. आता या प्रकरणी चौकशी होणार असल्याचे पोलसांनी सांगितले आहे. नेहाचा जीव घेतलेल्या चायनिज मांज्याचा दोषी कोण, हे कसे शोधणार, हा प्रश्नच आहे.

  चायनिज मांजा वापरु नका

  चायनिज मांजाला प्लास्टिक मांजा असेही म्हटले जाते. हा इतर धाग्यांप्रमाणे दोऱ्याने बनत नाही. तर नायलॉन आणि मेटालिक पावडरने बनविण्यात येतो. हा मांजा प्लास्टिकसारखा असतो आणि ताणता येतो. अशा स्थितीत जर या मांजाला खेचले तर तो तुटत नाही, तर खेचला जातो. या मांजाला ब्लेडसारखी धार असते. या मांज्याच्या विक्रीला बंदी आहे, तरी संक्रांतीच्या काळात त्याची सर्रास विक्री होते. एका मांज्याने एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची ही कहाणी, या मांज्याचा उपयोग का करु नये, यासाठी बोलकी असावी.