जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?; नितीन पाटील की शिवेंद्रराजे

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी (Satara District Bank Election) जोरदार रस्सीखेच होणार असल्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपदाची संधी नितीन पाटील यांना मिळणार की भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) यांची पुन्हा वर्णी लागणार, या राजकीय शक्यतांच्या चर्चांनी वातावरण ढवळले आहे.

    सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी (Satara District Bank Election) जोरदार रस्सीखेच होणार असल्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपदाची संधी नितीन पाटील यांना मिळणार की भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale) यांची पुन्हा वर्णी लागणार, या राजकीय शक्यतांच्या चर्चांनी वातावरण ढवळले आहे. जिल्हा बँकेची कमान सांभाळण्यासाठी सातारा व वाई तालुक्यात जोरदार चुरस असून, कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे.

    सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यावेळी झालेल्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशिकांत शिंदे या दोन दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. माजी आमदार प्रभाकर घार्गे हे कारागृहात असूनसुद्धा विजयी झाले. तिकडे माणमध्ये शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला चारलेली धूळ, कोरेगावात राष्ट्रवादीकडे संख्याबळ असून, सुद्धा राष्ट्रवादीला पाणी पाजत सुनील खत्री यांनी मिळवलेला विजय या अनेक अनाकलनीय गोष्टी जिल्ह्याने अनुभवल्या आहेत. आता यानंतर चर्चा सुरू आहे, ती जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? याची. त्यासाठी सध्या दोन नावांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सध्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि (कै.) लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील याची.

    सध्याची बँकेचे नवीन संचालक मंडळ बघता आमदार शिवेंद्रराजेंची सरशी असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यावर त्यांनी पराभवाचे खापर आमदार शिवेंद्रराजेंवर फोडले. ज्यांनी शशिकांत शिंदेंचा पराभव केला ते ज्ञानदेव रांजणे हे आमदार शिवेंद्रराजेंचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तसेच राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची आणि शिवेंद्रराजेंची मैत्री सर्व जिल्ह्याला परिचित आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंचे पारडे सध्या तरी या सगळ्या प्रक्रियेत जड दिसत आहे.

    नवीन संचालक मंडळात आमदार शिवेंद्रराजेंना मानणार गट वाढल्याने एक दबाव गट तयार झाला असून, त्या गटाकडून आमदार शिवेंद्रराजेंच्या नावाची जोरदार मागणी सुरू आहे. दुसरीकडे (कै.) लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील हे गेल्या टर्मला सुद्धा अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते पण शेवटच्या टप्प्यात आमदार शिवेंद्रराजेंनी बाजी मारली. यावेळी सुद्धा नितीन पाटील यांची राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांच्या नावाची शिफारस केली जात आहे. नितीन पाटील हे अध्यक्ष व्हावेत ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची जरी इच्छा असली तरी पुरेसे संख्याबळ आणि जिल्ह्यातील इतर जेष्ठ नेत्यांचा निर्णय यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत.

    राष्ट्रवादीप्रणित पॅनल विरुद्ध निवडून आलेल्या बहुतांश संचालकांनी आमदार शिवेंद्रराजेंच्या नावासाठी आग्रह धरल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीबाबत सध्यातरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा आमदार शिवेंद्रराजेंवर सोपवून बेरजेचे राजकारण करणार की राष्ट्रवादीच्याच नितीन पाटील यांना संधी देऊन नवीन चेहरा अध्यक्ष बनवणार या शरद पवार यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.