मुलांना मिळणार शाळेतच लस? राज्य सरकारची मागणी

नववर्षाच्या सुरुवातीपासून होणाऱ्या १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनेही तयारी सुरू केली आहे; मात्र, या लसीकरणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून या मुलांचे शाळेतच लसीकरण करा.

    मुंबई (Mumbai) : नववर्षाच्या सुरुवातीपासून होणाऱ्या १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनेही तयारी सुरू केली आहे; मात्र, या लसीकरणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून या मुलांचे शाळेतच लसीकरण करा, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. लसीकरणाबाबत आढावा घेण्यासाठी लवकरच ऑनलाइन बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी ही मागणी करण्यात येणार आहे.

    केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्याचा निर्णय घेतला. येत्या ३ जानेवारीपासून हे लसीकरण केले जाणार असून, त्यासाठी १ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. या नोंदणीसाठी दहावीचे ओळखपत्रही ग्राह्य धरले जाणार असून, या नोंदणी प्रक्रियेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून नियमावली तयार केली जात आहे. राज्य सरकारने यासाठी आतापासून कंबर कसली असून, यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची तयारीही सुरू झाल्याची माहिती हाती आली आहे. राज्यात सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातच १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता कोणीही लशीपासून वंचित राहू नये, म्हणून शाळेतच मुलांचे लसीकरण केल्यास त्याचा फायदा होईल, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

    त्यानुसार दोन दिवसानंतर केंद्र सरकारने याबाबत राज्या-राज्यांचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगचे आयोजन केले आहे. या बैठकीत वरील मागणी लावून धरली जाणार असल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने अद्याप नियमावली जाहीर केलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारचे या नियमावलींकडे लक्ष लागले आहे. या नियमावलीच्या अनुषंगाने पुढील तयारी केली जाणार आहे. या लसीकरणाच्या संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी आरोग्य विभागाची विशेष बैठक पार पडल्याची माहितीही हाती आली आहे.