ग्रंथ दिंडीत सहभागी होणार : महापौर कुलकर्णी

शहरात १६ वर्षांनी सारस्वतांचा मेळा अर्थात ९४ वे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाला आमचा विरोध अथवा बहिष्कार असे काहीच आम्ही करणार नाही, असे स्पष्ट करून महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) पुढे म्हणाले, त्यांनी जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांची नावे टाकले नाही. त्यामुळे आम्ही खंत व्यक्त केली.

    नाशिक : शहरात १६ वर्षांनी सारस्वतांचा मेळा अर्थात ९४ वे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाला आमचा विरोध अथवा बहिष्कार असे काहीच आम्ही करणार नाही, असे स्पष्ट करून महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) पुढे म्हणाले, त्यांनी जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांची नावे टाकले नाही. त्यामुळे आम्ही खंत व्यक्त केली. मात्र, साहित्य संमेलनानिमित्त (Sahitya Sammelan) आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीला आपण उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर कुलकर्णी यांनी दिली.

    यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की, साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा मुळीच विषय नाही. मात्र, आयोजकांनी जाणीवपूर्वक पत्रिकेत आमच्या नेत्यांची नावे टाकलेले नाही. वास्तविक केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार या नाशिकमध्ये राहत आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नावे पत्रिकेत यायला हवी होती. मात्र, त्यांनी ती नावे टाकली नाही. वास्तविक, साहित्य संमेलनाच्या मंडप भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला डॉ. भारती पवार यांच्यासह मीही उपस्थित होतो. नंतर विषय पत्रिकेत मात्र त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सर्वांची नावे टाकली आहेत.

    आमच्या नेत्यांची नावे जाणीवपूर्वक टाकली नाहीत

    भाजप नेत्यांची नावे का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला, या संदर्भात मला निमंत्रण देण्यासाठी संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आले होते. त्याबाबत आपण त्यांनाही विचारणा केली. आमचा विरोध वगैरे असा कुठलाही विषय नसून शहरात एक आनंद मेळावा होत आहे. त्याचे आनंदाने स्वागतच करायला हवे. याबाबत आमचा कुठलाही विरोध नाही. अथवा मानपान नाही. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांची नावे टाकलेले नाही, असेही ते म्हणाले.

    तसेच आनंदाचा सोहळा तो आनंदाने पार पडायला हवा. मात्र, या गोष्टीचा आम्हाला खेद वाटतो. महापालिकाही पालक संस्था म्हणून महापालिकेच्या वतीने आम्ही साहित्य संमेलनाला २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. त्याचप्रमाणे संमेलन ठिकाणचे अत्यावश्यक कामे, त्या भागातील रस्ते, आरोग्य तसेच पाणीपुरवठा यंत्रणा जे काही सहकार्य करता येईल. ते प्रथम नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य बजावणार आहे. ग्रंथ दिंडीच्या कार्यक्रमानंतर मात्र आपण उर्वरीत कार्यक्रमासाठी संमेलनस्थळी जाणार नाही, असेही महापौर म्हणाले.