राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

शाळा-कॉलेज, हॉटेल, मॉल , सिनेमागृह बंद करण्याबाबत कोणताही विचार नाही. पण नागरिक जर नियमांचं उल्लंघन करुन फिरत राहिले तर चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

  औरंगाबाद : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. लॉकडाऊन बाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. पण याच गतीने रुग्णसंख्या वाढत राहिली तर पर्याय नाही. काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

  तसेच राज्यातील निर्बंध आणखी कठोर करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. अजून शाळा-कॉलेज, हॉटेल, मॉल , सिनेमागृह बंद करण्याबाबत कोणताही विचार नाही. पण नागरिक जर नियमांचं उल्लंघन करुन फिरत राहिले तर चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

  लॉकडाऊनबाबत टोपे नेमकं काय म्हणाले?

  “लॉकडाऊन जरी कुणी म्हणत असेल तरीसुद्धा लॉकडाऊनचा अर्थ आताच नाही. लॉकडाऊनचा विषय सध्या अजिबात नाही. त्यामुळे माध्यमांनीही देखील लॉकडाऊनची भीती घालू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्य विभाग टास्क फोर्ससोबत दोन तासांच्या झालेल्या प्रदीर्घ बैठकीत कुठेही लॉकडाऊनची चर्चा झाली नाही. निर्बंध जरुर वाढवले पाहिजेत. लॉकडाऊनची भाषा आम्ही त्याचवेळेस करु जेव्हा 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचं कन्सप्शन होईल. त्यादिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होऊन जाईल, अशा पद्धतीने ठरविण्यात येईल. त्यामुळे आज लॉकडाऊनबाबत चर्चा झालेली नाही. संख्या वाढतेय हे निश्चितच आहे”, असं राजेश टोपे स्पष्टपणे म्हणाले.

  कठोर निर्णय घ्यावे लागले तर होय घ्यायचे आहेत

  लॉकडाऊनचा परिणाम थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस हा हातावर पोट भरतो. त्याच्यावर लॉकडाऊनचा थेट परिणाम होतो. लोकांनी पहिल्या-दुसऱ्या लॉकडाऊनचे चटके आणि झळ सोसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठक झाली. पंतप्रधानांनी देखील जान है तो जहाँ है, असं सांगितलंय. त्याच विचारांनी मुख्यमंत्री देखील याच विचाराचे आहेत. आपल्याला लोकांची काळजी अधिक घ्यायची आहे. त्यामुळे अशाप्रकारचे कठोर निर्णय घ्यावे लागले तर होय घ्यायचे आहेत. निर्बंध हा देखील त्यातील महत्त्वाचा भाग आहे. निर्बंध हे पहिलं पाऊल आहे. त्या अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे. निर्बंधच्या अनुषंगाने आपण लोकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. या निर्बंधाचे परिणाम लगेच दिसणार नाहीत. थोडावेळ लागतो. पण निर्बंधांच्या बाबतीत नक्कीच कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने काम करत आहोत. यावरुन नियंत्रणात आलं तर ठिकच आहे. नाही आलं तर रेस्टॉरंट, सिनेमाहॉल, मॉल, शाळा-कॉलेज, हॉटेलबाबत निर्णय घ्यावा लागेल. याशिवाय लसीकरणासाठी मोहीम राबवायची आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

  डेल्टा व्हेरिएंट हा जास्त घातक

  “कोरोना रुग्णांचे आकडे आता डबल होत आहेत ही वस्तुस्थिती आता आकड्यांवरुन दिसतेय. यामध्ये एकच वाटतं की, डेल्टा व्हेरिएंट हा जास्त प्रमाणात असू नये. कारण तो जास्त घातक आहे. त्या व्हेरिएंटमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येपासून ते ऑक्सिजन बेडपर्यंत रुग्णांना आवश्यकता भासते. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर ओमायक्रोन हा खूप वेगात पसरतो. एस जीनच्या अॅबसेंट आणि प्रेसेंटच्या अनुषंगाने वापरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कारण ओमायक्रोन आणि डेल्टा यापैकी किती आणि कोणते आहेत हे प्रमाण कळणं जास्त आवश्यक आहेत. ओमायक्रोन हे माईल्ड स्वरुपाचं आहे. त्यामुळे उपचारपद्धती वेगवेगळ्या आहेत”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

  निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करणं हे शासनासमोर आव्हानात्मक

  “काहीही झालं तरी संख्या वाढतेय या पार्श्वभूमीवर जे निर्बंध घातले गेले आहेत त्याची कठोर अंमलबजावणी करणं हे शासनासमोर आव्हानात्मक आहे. संसर्ग वाढू नये या दृष्टीकोनातून उपाय करणं हे शासनासमोर प्रथम प्राधान्य आहे. त्याअनुषंगाने 30 डिसेंबरला रात्री नवे निर्बंध लागू करण्याचं जाणीवपूर्वक ठरवलं आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.