कॉंग्रेसला धक्का देत विजय वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करणार का ? मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा दावा

कॉंग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा अजित पवार गटातील नेत्यांनी केला आहे.

    नागपूर : लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांची नाराजी आणि पक्षांतर यांची सत्रे वाढली आहेत. दरम्यान, कॉंग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा अजित पवार गटातील नेत्यांनी केला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे.

    त्यांना पक्षात किंमत नाही

    गडचिरोली लोकसभेवरुन पुन्हा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि कॅबीनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम आमने सामने आलेले आहेत. विजय वडेट्टीवार हे आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये मुलीला तिकीट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते मात्र त्यांना तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले,  मुलीच्या तिकीटासाठी वडेट्टीवार यांनी 10 दिवस दिल्लीत होते पण तिकीट आणू शकले नाही. वडेट्टीवार गडचिरोली मध्ये डॉ. उसेंडी यांच्यासाठीही तिकीट आणू शकले नाही, त्यामुळे त्यांना पक्षात किंमत नाही हे महाराष्ट्राला माहित आहे. विजय वडेट्टीवार यांना कॉंग्रेसमध्ये किंमत नाही. त्य़ामुळे विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार असल्याचा दावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    मुलीला तिकीट न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज

    यापूर्वी देखील अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम व कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. आधी वडेट्टीवार यांनी आत्राम यांना बुद्धी नाही असं म्हटलं, त्यानंतर धर्मरावबाबा आत्राम यांनी वडेट्टीवार भाजपात येणार, त्यांची बैठक झाल्याचा दावा केला. त्यावर वडेट्टीवार यांनी आत्राम यांच्या नार्को टेस्टची मागणी केली होती. यानंतर आता धर्मरावबाबा आत्राम यांनी विजय वडेट्टीवार यांच्याबाबत भाजपमध्ये येणार असल्याचा दावा केला आहे.  मुलीला तिकीट न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज आहेत. चंद्रपूर लोकसभेत फार काम करत नाही. मोदी सरकारच्या कामांमुळे आम्ही गडचिरोली मोठ्या मतांच्या फरकाने जिंकणार आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी वडेट्टीवार यांच्यावर पलटवार करत मुलीसाठी तिकीट आणू शकले नाही, पक्षात त्यांची किंमत नाही, असं म्हणत वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केला आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.