अकलूज परिसरात भरली हुडहुडी; उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी

गेल्या महिन्यातील प्रचंड उकाडा तसेच धुवांधार पावसाचा अनुभव घेणारे अकलूजकर आता कडाक्याच्या थंडीने कुडकुडत आहेत. सध्या देशातील उत्तरेकडील राज्यात शीत वाऱ्याच्या लहरी वाहत असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे; परिणामी राज्यभरात हुडहुडी भरली आहे. 

    अकलूज : गेल्या महिन्यातील प्रचंड उकाडा तसेच धुवांधार पावसाचा अनुभव घेणारे अकलूजकर आता कडाक्याच्या थंडीने कुडकुडत आहेत. सध्या देशातील उत्तरेकडील राज्यात शीत वाऱ्याच्या लहरी वाहत असल्याने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे; परिणामी राज्यभरात हुडहुडी भरली आहे.

    सोलापूर जिल्ह्यातील बागायत क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या अकलूज परिसरात रात्रीचा गारवा वाढला आहे. थंडीपासून बचाव करून घेण्यासाठी परिसरातील नागरिक रात्री व पहाटे शेकोट्या पेटवत आहेत. तसेच रजई, मफलर, हातमोजे, स्वेटर इत्यादी गरम कपडे खरेदी करताना दिसत आहेत. रस्त्यावर जागोजागी गरम व उबदार कपड्यांची दुकाने थाटलेली असून, त्याठिकाणी व तसेच कापड दुकानात नागरिक गरम कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसतात. उत्तरेकडील थंडीची ही लाट आणखी दोन दिवस कायम राहणार असून, या भागातील किमान तापमान अकरा ते बारा अंशापर्यंत येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    बंगालच्या उपसागर व अरबी समुद्रात झालेले कमी दाबाचे क्षेत्र व चक्रीवादळाच्या स्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाळी वातावरण तयार झाले होते. जिल्ह्यात अवकाळी पाऊसही झाला. या काळात  सतत पडत असलेल्या पावसामुळे अकलूज परिसरात रेनकोट, पावसाळी छत्र्या व टोप्यांची दुकाने थाटले होती. तर लगेच पंधरा दिवसाच्या अंतराने या ठिकाणी गरम कपड्यांची दुकाने थाटलेली पाहायला मिळतात.

    ‘दोन-चार दिवसांपूर्वीच संपूर्ण जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडी जाणवत नव्हती. हवेतील तापमानात वाढ होऊन वातावरणात उकाडा जाणवत होता. परंतु, वातावरणात अचानक बदल घडून तापमानात घट होऊन अचानक थंडी पडत आहे. या थंडीच्या लाटेने पिकांना पूरक परिस्थिती निर्माण होत असली तरी मानवी आरोग्यावर त्याचे परिणाम जाणवतात’.

    – डॉ. अरविंद कुंभार, पर्यावरण अभ्यासक, अकलूज.