यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात संयमी आणि खंबीर भूमिका मांडली : प्रा. दास

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात व समाजकारणात संयमी आणि खंबीर भूमिका मांडली. दिल्लीही अडचणीत असताना खंबीरपणा दाखवत त्यांना साथ देण्याचे काम यशवंतरावांनी केले, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. राजेंद्र दास यांनी केले.

  बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात व समाजकारणात संयमी आणि खंबीर भूमिका मांडली. दिल्लीही अडचणीत असताना खंबीरपणा दाखवत त्यांना साथ देण्याचे काम यशवंतरावांनी केले, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. राजेंद्र दास (Rajendra Das) यांनी केले.

  तसेच यशवंतरावांनी शालेय शिक्षण घेत असतानाच स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली व प्रसंगी कारावासही भोगला. चव्हाण यांच्या नेतृत्वाला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या सबंध राजकीय जीवनात त्यांनी कधीही नैतिक विवेकाचा आवकाश संकुचित होऊ दिला नाही, असेही राजेंद्र दास म्हणाले.

  यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव होते. आपल्या भाषणात यशवंतराव चव्हाण यांचे कार्य खूप महान होते. म्हणूनच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला जात आहे, असेही दास यांनी स्पष्ट केले.

  कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे संचालक व संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे म्हणाले, यशवंतराव चव्हाण आणि डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे जुने ऋणानुबंध होते. ते बार्शीत आल्यानंतर हमखास या संस्थेस भेट देत होते. संस्थेच्या इमारतीच्या बांधकामवेळी त्यांनी मोठ्या मनाने मदतही केली आहे. यशवंतरावांच्या कार्याची उतराई म्हणूनच संस्थेनेही त्यांच्या नावाने अत्याधुनिक ग्रंथालय उभे केले आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढे बार्शी शहर व परिसरात जलसंधारण आणि महिलांच्या सबलीकरणाच्या बाबतीत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले.

  याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, सहसचिव अरूण देबडवार, माजी सचिव विष्णु पाटीत, विश्वस्त डॉ. चंद्रक्रांत मोरे व प्रभारी प्राचार्या डॉ. भारती रेवडकर उपस्थित होते.

  पाहुण्याचे स्वागत संस्थेचे सचिव पी. टी. पाटील यांनी केले तर परिचय डॉ. रविकांत शिंदे यांनी करून दिला. आभार माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.