हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या, मग आरोप करा; डॉ. येळगावकरांचं प्रभाकर देशमुखांना आव्हान

    वडूज : प्रभाकर देशमुखांचे काही दिवसांपूर्वी माझ्यावर केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून, त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा करणार असल्याचं माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी वडूज येथील पत्रकार परिषदेत सांगितले.

    जिल्हा बँक निवडणूक खटाव सोसायटी मतदार संघातून विजयी झालेल्या माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या विजयी मिरवणुकीत माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी खटाव माण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले होते, त्या अनुषंगाने माजी आयुक्त प्रभाकर देशमुखांनी काही दिवसांपूर्वी वडूज येथील पत्रकार परिषदेत माजी आमदार डॉ. येळगावकरांनी संस्था मोडित काढून अनेक ठेवीदारांची कुटुंबं उध्वस्त केल्याचा आरोप केला. यावर डॉ. येळगावकरांनी वडूज येथे पत्रकार परिषद घेऊन हिम्मत असेल तर प्रभाकर देशमुखांनी व्यासपीठावर येवून आरोप करावेत, देशमुख हे आतल्या गाठीचे असून त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अनिल देसाई, रणजित देशमुख यांच्यामध्ये भांडणे लावली.

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटूनच त्यांनी अपक्ष उमेदवारी केली, लायकी नसलेला, शूद्र मनोवृत्ती, घातकी वृत्तीचा माणूस म्हणजे प्रभाकर देशमुख. निवडणुकीनंतर त्यांची नियत फिरली असल्याचं सांगून वडूज, गोंदवले कोव्हीड सेंटरमध्ये यांचे योगदान काय ? असा सवालही डॉ. येळगावकर यांनी यावेळी केला.

    विधानसभेस केलेली चूक परत करणार नाही

    गुगलवर सर्च करून त्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे शोधले आहेत. योग्यवेळी ते जनतेसमोर मांडेन आता नागाच्या शेपटीवर पाय दिलाय तर भोगायला तयार रहा. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचंही डॉ. दिलीप येळगावकर यावेळी म्हणाले.

    यावेळी माजी सभापती नाना पुजारी, मंदार जोशी आदींची उपस्थिती होती.