नागपुरात बेघर आहात, घाबरू नका; मनपाने काय केली आहे ‘ही’ व्यवस्था?

नागपुरात गेल्या दोन दिवसांपूर्वी थंडीत कुडकुडत पाच जणांचे मृतदेह सापडले. त्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली. त्यांनी बेघरांसाठी निवाऱ्याची व्यवस्था केली आहे.

    नागपूर (Nagpur) : सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सर्व बेघर निवारा केंद्रांमध्ये 24 तास सेवा आहे. येथे निवासासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नाही. शहरात थंडी वाढत असल्यामुळे शहरातील बेघरांनी आपल्या जवळच्या निवारा केंद्राचा लाभ घ्यावा. या कार्यात शहरातील नागरिकांनीही मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना आणि उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी केले आहे.

    निवारा केंद्रात 280 बेड्सची व्यवस्था
    या निवारा केंद्रात 280 बेड्सची व्यवस्था आहे. यात सद्यस्थितीत 172 नागरिक निवारा केंद्राचा लाभ घेत आहेत. मनपाच्या बेघर निवारा केंद्रात बेघर नागरिकांना मोफत राहण्याची सुविधा आहे. यामध्ये रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांना सुद्धा राहण्याची मोफत व्यवस्था आहे. येथे राहणाऱ्या 60 वर्षावरील नागरिकांना मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच 60 वर्षाखाली नागरिकांसाठी अल्प दरात अल्पोपहार व भोजनाची सुविधा देण्यात येते.

    खालील ठिकाणी साधा संपर्क
    नागपूर शहरात आसरा शहरी बेघर निवारा, बुटी कन्या शाळा, बुटी दवाखान्याजवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, (9960183143), सावली शहरी बेघर निवारा, हंसापुरी प्राथमिक व माध्यमिक शाळा, टिमकी, भानखेडा (9049752690), सहारा शहरी बेघर निवारा बुटी गणेश टेकडी उड्डाण पुलाखाली, रेल्वे स्टेशन रोड (9595915401), आश्रय शहरी बेघर निवारा, संत गुरु घासीदास समाज भवन, साखरकारवाडी, डिप्टी सिग्नल (7498466691), बोधिसत्व शहरी बेघर निवारा, मिशन मोहल्ला, इंदोरा (9975934267), आपुलकी शहरी बेघर निवारा, इंदोरा समाज भवन परिसर मिशन मोहल्ला, नवीन इमारत (8329213219) असे सहा ठिकाणी बेघरांसाठी व्यवस्था करणऱ्यात आली आहे.

    सामाजिक संस्थांमार्फत वाहनांची व्यवस्था
    शहरात फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना जवळच्या बेघर निवारा केंद्रात आणले जाते. यासाठी सामाजिक संस्थेमार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कामासाठी नागपूर पोलिसांचीसुद्धा मदत घेण्यात येते. डिसेंबर महिन्यात अचानक थंडी वाढल्याने मागील 15 दिवसात फूटपाथवर राहणाऱ्या 40 बेघर नागरिकांची मनपाच्या निवारा केंद्रात त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. शहरातील ज्या भागांमध्ये बेघर असतील त्यांची माहिती मनपाला देऊन त्यांना निवारा केंद्राचा लाभ मिळवून देण्यात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.