‘राष्ट्रवादीच्या मेहरबानीवरच तुम्ही राज्यमंत्री’; पाटणकर यांचा देसाईंवर घणाघात

केवळ सत्ता व अर्थकारणाच्या जोरावर आपण वाटेल ते करू शकतो, हा त्यांचा भ्रम बाजूला सारून मतदारांनी त्यांचा दारुण पराभव केला. या पराभवात दोष राष्ट्रवादीचा का तुमचा?

    पाटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कृपाशिर्वादानेच राज्यात महाविकास आघाडी होऊन शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत राहून कधी राष्ट्रवादीला खुनवायचे तर कधी काँग्रेसला डोळा मारायचा, भाजपची सत्ता आली की तत्कालीन मुख्यमंत्री आपले मित्र असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळेच राज्यमंत्रिपद मिळाले हे ते विसरत आहेत.

    सगळ्याच सत्ता आपल्याला मिळाव्यात परंतु सर्व प्रयोग करूनही मतदारांनी त्यांना बहुमताने डावललं. त्याचं खापर राष्ट्रवादीवर फोडून राजकीय थयथयाट करणारे राष्ट्रवादीला इशारा देत आहेत. एवढीच हिंमत असेल तर राष्ट्रवादीच्या मेहरबानीतून मिळालेल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांनी मगच राष्ट्रवादीला इशारा द्यावा, असे आव्हान जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

    सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, राष्ट्रवादीला इशारा देण्याइतपत शंभूराज देसाई मोठे नाहीत किंवा शिवसेनेचा कळण्याइतपत ते सेनेशी कधीही एकनिष्ठ नाहीत. केवळ सध्या सत्तेत वाटा मिळाल्याने त्यांना सेनेचा उसना कळवळा आणण्याची काहीच गरज नाही. हिंमत असती तर जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी पॅनेलमधून त्यांना बाहेर काढूनही ते स्वतःच्या हिंमतीवर निवडून आले असते. जिल्ह्यात स्वतःच्या हिमतीवर विरोध करत शिवसेनेतून निवडून आलेले संचालक आहेत. अगदी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन स्वतःच्या विश्वासू समर्थकांना निवडून आणण्याची किमयाही सेना आमदारांनी याच निवडणुकीत दाखवली. मग यांनाच राष्ट्रवादीची गरज आणि भीती का वाटते हे त्यांनी जाहीर करावे.

    राजकीय भोंगा वाजवण्याचा खटाटोप कशासाठी?

    केवळ सत्ता व अर्थकारणाच्या जोरावर आपण वाटेल ते करू शकतो, हा त्यांचा भ्रम बाजूला सारून मतदारांनी त्यांचा दारुण पराभव केला. या पराभवात दोष राष्ट्रवादीचा का तुमचा? यावरूनच तुमचे कर्तृत्व तालुका, जिल्हाच नव्हे तर आता राज्यालाही समजले आहे. आजपर्यंतचा गाड्यांचा कर्णकर्कश्य भोंगा मतदारांनी बंद केला आता राष्ट्रवादीला इशारा देत राजकीय भोंगा वाजवण्याचा खटाटोप कशाला करताय असा सवालही पाटणकर यांनी उपस्थित केला.