लहान मुलांच्या भांडणाच्या रागातून तरुणावर धारदार शस्त्राने वार; मलकापूर फाटा येथील घटना

मलकापूर फाटा (ता. कराड) येथे बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने भोसकल्याची घटना घडली. या घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून, जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    सातारा : मलकापूर फाटा (ता. कराड) येथे बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पाच जणांनी एकास धारदार शस्त्राने (Satara Crime) भोसकल्याची घटना घडली. या घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून, जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्वास हणमंत येडगे (रा. अहिल्यानगर, मलकापूर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

    याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लहान मुलांच्या कारणावरून मंगळवारी रात्री वादावादी व भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास मलकापूर फाटा येथील सेवा रस्त्यावर पाच जणांनी विश्वास येडगे यांना धारदार शस्त्राने भोसकले. घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून, जखमीला उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कराडचे पोलिस उप अधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस बी. आर. पाटील यांच्यासह राहुल वरोटे, अमित बाबर, सरोजिनी पाटील व पोलिस कर्मचारी घटनास्थळांचा पंचनामा केला आहे.