युवतीशी शारीरिक संबंधांनंतर युवकाने मोडले लग्न; नागपूर खंडपीठात याचिका दाखल

    नागपूर (Nagpur) : ‘त्याने’ साखरपुडा झाल्यानंतर वागदत्त वधूशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र, ‘ती’ आपल्याला अनुरूप नसल्याचे कारण देत लग्न मोडत असल्याचे जाहीर केले. या युवकाविरुद्ध युवतीने पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीविरुद्ध युवकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. आपल्याविरुद्धचा बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. खंडपीठाने हे गुन्हे रद्द करण्यास नकार दिला आहे. ‘मुलगी अनुरूप नव्हती तर सुरुवातीलाच लग्नाला नकार द्यायचा होता. शारीरिक संबंधांनंतर लग्न मोडणे, हे आरोपीचे वर्तन त्याच्याविरुद्ध जाणारे आहे’, असे मत नोंदवित न्यायालयाने नोंदविले.

    आरोपी युवक हा भंडाऱ्याचा तर पीडित युवती ही नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. जानेवारी २०२१मध्ये या दोघांचे लग्न ठरले. फेब्रुवारी २०२१मध्ये साखरपुडा झाला. दोनच महिन्यांनी एप्रिल महिन्यात लग्न होणार होते, परंतु, करोनाच्या दुसऱ्या लाटेतील निर्बंधांमुळे हा विवाह पुढे ढकलण्यात आला. मे महिन्यात या युवतीला करोनाची बाधा झाल्याने विवाह दुसऱ्यांदा पुढे ढकलावा लागला. तिचा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाढदिवस होता. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आरोपीने उमरेड-कऱ्हांडला येथील एका रिसॉर्टवर पार्टी ठेवली. येथे इतर मित्रांनाही आमंत्रित करण्यात आले होते. रात्री पार्टी आटोपल्यावर आरोपी सदर युवतीच्या खोलीत गेला. त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. तिने नकार दिला. मात्र, लवकरच आपले लग्न होणार असल्याचे आमिष देत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर मात्र आरोपी तिला टाळू लागला. यानंतर काही दिवसांत त्याने युवती आपल्याला अनुरूप नसल्याने आपण हे लग्न मोडत असल्याचे कळविले.

    अखेर युवतीने उमरेड पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ही तक्रार खोटी असून आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा, अशा आशयाची याचिका आरोपीने उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायमूर्तीद्वय ए. एस. चांदूरकर आणि जी. ए. सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अॅड. जे. बी. गांधी यांनी याचिकाकर्त्याची, तर अतिरिक्त सरकारी वकील एस. एस. जाचक यांनी सरकारची व अॅड. एस. व्ही. देशमुख यांनी पीडितेची बाजू मांडली.

    ‘पीडितेने विश्वासातून होकार दिला’
    आरोपीने उपस्थित केलेला अनुरूपतेचा मुद्दा खरा असता तर त्याने लग्नाला होकार दिला नसता. पीडिता शारीरिक संबंधास तयार नसताना त्याने लग्नाचे आमिष दाखविले. लग्न ठरलेलेच होते. त्यामुळे युवतीने आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांवर विश्वास ठेवला आणि शारीरिक संबंधास होकार दिला. मात्र, आरोपीने शारीरिक संबंधांनंतर लग्न मोडले. त्यामुळे गैरसमजातून दिलेला होकार हा संमती म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. आरोपीने केलेली फस‌णूक ही साधीसुधी फसवणूक नसून त्यात बलात्कारासारखा गंभीर गुन्हा समाविष्ट आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी तरी या गुन्ह्याचा सखोल तपास होणे आवश्यक असून हा गुन्हा रद्द करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळली.