दोन वेगवेगळ्या अपघातात चिमुकलीसह तरुणीचा मृत्यू

श्रीकांत हे रविवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पुतणी गायत्री व गौरी यांना दुचाकीवरून घेऊन शिवाजी पुलाजवळून जात होते. त्यावेळी प्रिमीयर गॅरेज चौकाचे काही अंतरावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला डाव्या बाजूने जोराची धडक दिली.

    पुणे : शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका १३ वर्षीय चिमुकलीसह तरुणीचा मृत्यू झाला आहे. शिवाजीनगर व येरवडा परिसरात हे अपघात झाले आहेत. पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
    शिवाजीनगर येथे झालेल्या अपघातात गायत्री रेमजे (वय १३) या चिमुकलीचा झाला आहे. तर, गौरी रेमजे (वय ८) व काका श्रीकांत रेमजे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी ट्रक चालक आब्बासअली खाजामिया सैय्यद (वय ३५) याला अटक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत हे रविवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पुतणी गायत्री व गौरी यांना दुचाकीवरून घेऊन शिवाजी पुलाजवळून जात होते. त्यावेळी प्रिमीयर गॅरेज चौकाचे काही अंतरावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला डाव्या बाजूने जोराची धडक दिली. यात तिघेही खाली कोसळले. यात गायत्री हिला गंभीर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. तर, दोघेजन जखमी झाले. अधिक तपास उपनिरीक्षक नाईकवडे हे करत आहेत.

    तर, दुसरा अपघात हा येरवडा परिसरात झाला असून, यात विभा कांतीलाल जैन (वय २५, रा. नाना पेठ) या तरुणीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विभा यांचा मित्र प्रिन्स मेहता (वय २५, रा. गुरूवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे. प्रिन्स व विभा हे मित्र असून, ते रविवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास फिनीक्स मॉलकडून नगरच्या दिशेने निघाले होते. घराकडे जात होते. त्यावेळी आगाखान पॅलेसच्या काही अंतरावर भरधाव ट्रकने त्यांना पाठिमागून उजव्या बाजूने जोराची धडक दिली. यात दोघेही खाली पडून जखमी झाले. यात विभा यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.