मराठवाड्यात कोरोनावर ४० कोटी खर्च, उपाययोजनांसाठी ४६७ कोटींपेक्षा जास्त रुपयांची मागणी

कोरोना काळात आगामी उपाययोजनांसाठी ४६७ कोटी ९० लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु राज्य आपात्कालीन निधी मधून आलेल्या ५२ कोटी ५० लाखांपैकी आठ जिल्ह्यांना ४० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता झाल्या आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांत कोरोनाविरोधात उपाययोजना राबवण्यात आल्या यावर अवाढाव्य खर्च झाला. आतापर्यंत राज्य आपात्कालीन मदत निधी मधून आलेल्या ५२ कोटी ५० लाखांपैकी ४० कोटी रुपयांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याचा अहवाल आयुक्तालयाकडे प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या दिलेल्या रक्कमेचा वापर कुठे आणि कसा करण्यात आला याबाबत हिशोब मागवण्यात आला आहे.

कोरोना काळात आगामी उपाययोजनांसाठी ४६७ कोटी ९० लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु राज्य आपात्कालीन निधी मधून आलेल्या ५२ कोटी ५० लाखांपैकी आठ जिल्ह्यांना ४० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता झाल्या आहेत. मार्च ते एप्रिल या काळात एसडीआरएफ फंडातून मराठवाड्याला ५२ कोटी ५० लाख रुपये देण्यात आले. ही रक्कम एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी आहे. यामध्ये ऑगस्ट अखेर ४० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता दिल्याचा अहवाल सर्व जिल्ह्यांनी पाठविला आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक १६ कोटी ५० लाख रुपये औरंगाबाद जिल्ह्याला देण्यात आले होते. हा निधी प्रामुख्याने कोविड केअर सेंटरची उभारणी, तसेच तेथे आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी होता.

मराठवाड्यात २५ टक्के निधी कोरोनासाठी खर्च

आपात्कालीन उपाययोजनांसाठी मराठवाड्याला ६६३ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यातील २५ % म्हणजे १६५ कोटी रुपये कोविड उपाययोजनांसाठी देण्याचे नियोजन आहे. कोरोनामुळे विभागाच्या नियोजन समितीच्या १५१३ कोटींच्या निधीत कपात करण्यात आली आहे.