मराठवाड्याची यंदा पाणीटंचाईपासून सुटका, धरणांमध्ये अजूनही ५३ टक्के पाणीसाठा

मराठवाड्यांतील ११ मोठ्या धरणांमध्ये सध्या ५३ टक्के पाणीसाठा आहे. एकूण ५ हजार १४३ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेपैकी सध्या ४ हजार ४२१ घनमीटर एवढा साठा या धरणांमध्ये आहे. यापैकी प्रत्यक्ष उपयुक्त पाणीसाठी २ हजार ७०९ दशलक्ष घनमीटर आहे. गेल्या आठवड्यात हा साठा ११७९ दशलक्ष घनमीटर इतका होता. 

    मराठवाडा आणि दुष्काळ हे दर उन्हाळ्यात ठरलेलं समीकरण. मात्र यंदा चित्र वेगळं आहे. सध्या देशभरात कोरोनानं धुमाकूळ घातलेला असताना आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना यंदा मराठवाड्यातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येणार नाही, अशी स्थिती आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये यंदा मुबलक पाणी असून पावसाळा येईपर्यंत पुरेल, इतपत पाणीसाठी असल्याचं आकडेवारीवासून दिसून येतंय.

    मराठवाड्यांतील ११ मोठ्या धरणांमध्ये सध्या ५३ टक्के पाणीसाठा आहे. एकूण ५ हजार १४३ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेपैकी सध्या ४ हजार ४२१ घनमीटर एवढा साठा या धरणांमध्ये आहे. यापैकी प्रत्यक्ष उपयुक्त पाणीसाठी २ हजार ७०९ दशलक्ष घनमीटर आहे. गेल्या आठवड्यात हा साठा ११७९ दशलक्ष घनमीटर इतका होता.

    मराठवाड्यातील प्रमुख धरणांचा विचार करता औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणाची साठवण क्षमता २१७१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी सध्या १८४३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून ११०५ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील इतर धरणांमध्येही अशीच परिस्थिती असून दरवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा या धरणांमध्ये उपलब्ध असल्यामुळे यंदाचा उन्हाळा मराठवाड्यातील जनतेला सुकर जाईल,अशी चिन्हं आहेत.