मराठवाडयात लॉकडाउननंतर ५४ हजार नवीन वीज जोडण्या

औरंगाबाद (Aurangabad) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधी लॉकडाउनमध्ये गेल्यानंतर महावितरणकडून एप्रिल महिन्यापासून औरंगाबाद प्रादेशिक विभागात नवीन वीज जोडण्या देण्यासाठी गती देण्यात आली आहे. यात गेल्या सहा महिन्यांमध्ये औरंगाबाद, लातूर आणि नांदेड परिमंडलात सर्व वर्गवारीतील ५४ हजार २१४ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद (Aurangabad): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधी लॉकडाउनमध्ये गेल्यानंतर महावितरणकडून एप्रिल महिन्यापासून औरंगाबाद प्रादेशिक विभागात नवीन वीज जोडण्या देण्यासाठी गती देण्यात आली आहे. यात गेल्या सहा महिन्यांमध्ये औरंगाबाद, लातूर आणि नांदेड परिमंडलात सर्व वर्गवारीतील ५४ हजार २१४ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गेल्या मार्च पासून लॉकडाउन सुरू आहे. एप्रिल, मे महिन्यात कडकडीत टाळेबंदी असल्याने महावितरणकडून वीज पुरवठा सुरळित ठेवण्याचे काम वगळता इतर कामकाज ठप्प झाले होते; मात्र जून पासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली व सर्व प्रशासकीय कामांना वेग देण्यात आला आहे. यामध्ये नवीन वीज जोडण्या देण्याच्या कामास प्राधान्य देत आवश्यक प्रक्रिया वेगवान करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांनी दिले होते. तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी औरंगाबाद प्रादेशिक विभागाचा व्हीडीओ कॉन्फर्सिंगद्वारे आढावा बैठक घेवून नवीन वीज जोडण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जावर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

ज्या ठिकाणी पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही. त्याठिकाणी तात्काळ नवीन वीज जोडणी कार्यान्वित करण्यात यावी तसेच प्राप्त झालेल्या वीज जोडणीच्या अर्जावर पुढील कार्यवाही वेगाने करावी, असे निर्देश औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. त्यानुसार गेल्या सहा महिन्यांमध्ये औरंगाबाद परिमंडलात 18,333 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. लातूर परिमंडलात 18,463 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. तर नांदेड परिमंडलात 17,418 नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. औरंगाबाद प्रादेशिक विभागात एप्रिल 2020 ते आॅक्टोंबर 2020 पर्यंत 54,214 वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

परिमंडल कार्यालय नवीन वीज जोडण्या
औरंगाबाद –      18,333
लातूर        –       18,463
नांदेड        –       17,418
—————————-
एकूण      —-   54,214

अडचण असल्यास येथे संपर्क करा
महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अँपद्वारे नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच नवीन वीज जोडणीबाबत तक्रार किंवा काही अडचण असल्यास संबंधित विभागाच्या अधिका—यांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.