रोहित्र बिघाडासह वीजेसंबंधीच्या सर्व तक्रारी महावितरणच्या अॅपद्वारे करता येणार

औरंगाबाद : रोहित्र बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला तर  याची तक्रार करण्यासाठी आता महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. बसल्या ठिकाणाहून इंटरनेटच्या माध्यमातून  महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची  सुविधा महावितरणकडून वीज ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

महावितरण वीज ग्राहकांना सतत नाविण्यापूर्ण अत्याधुनिक  सुविधा देवून सुरळित वीज पुरवठा देण्यासाठी  कटिबध्द आहे. आपल्या भागातील घरगुती, व्यापारी, औघोगिक व कृषीपंपाचा  वीज पुरवठा रोहित्र बिघाडामुळे  खंडित झाला असेल, तर आता  रोहित्र  बिघाडाची तक्रार करण्यासाठी महावितरणच्या  कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. याची तक्रार  महावितरणच्या अॅपवर रोहित्र बिघाडाची तक्रार करता येणार आहे. यामुळे वीज ग्राहकांचा वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होणार आहे. रोहित्र बिघाडाची तक्रार महावितणरच्या अॅपवर   प्राप्त होताच महावितरण यत्रंणेला तात्काळ याची माहिती मिळेल. व  त्यामुळे  रोहित्र दुरूस्तीचे  नियोजन करून ग्राहकांना लवकरात लवकर रोहित्र उपलब्ध करून वीज पुरवठा सुरळितपणे करून  देण्यासाठी  प्रयत्न करण्यात येतील.

महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालया अंतर्गत औरंगाबाद परिमंडल १६० रोहित्र, लातूर परिमंडल १२१ रोहित्र, नांदेड परिमंडल ८५ रोहित्र असे एकूण ३६६ रोहित्र  बिघाड झाल्याची माहिती ग्राहकांतर्फे महावितरणच्या अॅपवर नोंदविण्यात आलेली  आहे. वीज ग्राहकांनी रोहित्र बिघाड झाल्यास व अन्य विजेसंबंधिच्या तक्रारी  महावितरणच्या अॅपवर नोंदवाव्यात असे   आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.