‘असा’ घडला फिल्मी थरार, तो पण 60 किमीचा; ‘त्यांनी’ ट्रायल म्हणून पळवली कार, पण सापडले पोलिसांच्या कचाट्यात

जुनी कार खरेदी-विक्री दालनातील एक कार ट्रायल म्हणून काही चोरट्यांनी पळवली. सोबत आलेल्या दालनातील कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून कार अज्ञात स्थळी नेली आणि दीड लाख दिले तरच कार परत देईन अन्यथा मालकाचा खून करेल, अशी धमकी दिली. त्यापुढेही कार सुसाट घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनीही तितकाच वेगवान पाठलाग करत जेरबंद केल्याची घटना औरंगाबादेत नुकतीच घडली आहे.

  औरंगाबाद : जुनी कार खरेदी-विक्री दालनातील एक कार ट्रायल म्हणून काही चोरट्यांनी पळवली. सोबत आलेल्या दालनातील कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून कार अज्ञात स्थळी नेली आणि दीड लाख दिले तरच कार परत देईन अन्यथा मालकाचा खून करेल, अशी धमकी दिली. दरम्यान त्यापुढेही कार सुसाट घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनीही तितकाच वेगवान पाठलाग करत जेरबंद केल्याची घटना औरंगाबादेत नुकतीच घडली आहे. तब्बल 60 किमीच्या या थरारक पाठलागाची चर्चा काल शहरात सुरू होती.

  नेमकं काय घडलं?

  औरंगाबाद शहरातील गुलाबविश्व हॉलजवळ वैष्णवी मोटर्स हे जुन्या वाहन खरेदी-विक्रीचे दुकान आहे. तेथे बुधवारी दुपारी 12 वाजता सय्यद अरबाज सय्यद आरेफ आणि फैसल रफिक सय्यद हे दोघे आले. दालनाचे मालक पाटील यांच्याशी चर्चा करून वोक्सवॅगन कंपनीची कार (एमएच 25 डिसी 3488) खरेदी करण्याची तयारी दाखवली. तसेच खरेदी करण्यापूर्वी कारची एका ट्रायल घ्यायची विनंती या दोघांनी केली. त्यामुळे दालनमालकांनी आपला 21 वर्षीय कर्मचारी रोहन संजय इंगळे याला सोबत दिले. फैसल आणि सय्यद या दोघांनी कारची ट्रायल सुरु केली.

  तुझ्या मालकालाही मारून टाकू

  ड्रायव्हर अरबाजच्या बाजूला कर्मचारी राहूल तर मागील बाजूस फैसल बसला होता. नारेगावच्या दिशेने गाडी वळताच फैसलने राहुलच्या गळ्याला चाकू लावला. तो प्रचंड घाबरला. अरबाजने गाडी एपीआय कॉर्नरमार्गे जालना रस्त्यावरून थेट बाबा चौकापुढील निर्मनुष्य भागात नेली. कार निर्मनुष्य रस्त्यावर नेल्यानंतर कर्मचारी रोहनला ‘ दीड लाख दिल्याशिवाय कार मिळणार नाही, तसेच तुझ्या मालकालाही मारून टाकू’ अशी धमकी देत या दोघांनी त्याला उतरवून दिले.

  रोहन खाली येताच कार सुसाट वेगाने घेऊन हे दोघे निघून गेले. बाबा पेट्रोलपंप परिसरात उतरलेल्या रोहनने ही सर्व माहिती आपल्या मालकाला दिली. गुन्हे शाखेने सुसाट वेगाने सूत्रे हलवली. अंडरवर्ल्ड डॉनला पकडण्यासाठी ज्या प्रकारे चित्रपटांमध्ये थरारक पाठलाग केलेला दर्शवतात. त्याच पद्धतीनं औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेनं सूत्र हलवली.

  दरम्यान गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, जिन्सीचे वरिष्ठ निरिक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी तत्काळ दालनाकडे धाव घेऊन घटनाक्रम समजून घेतला. त्यानंतर छावणी, महामार्ग पोलिस, वाळूज एमआयडीसी, दौलताबाद, वैजापूर, वाहतूक शाखा अशा सर्व ठिकाणच्या पोलिसांना अलर्ट करत रस्त्यावर उतरण्याच्या सूचना दिल्या. आणखी एक पथकाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे लुटारू कोणत्या दिशेने गेले याचा माग घेतला. लुटारुंची दुचाकी दालनासमोर उभी होती. त्यावरून त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोलिस पोहोचले.

  …अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात आले

  संबंधित लुटारूंची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्याचे लक्षात आले. आरोपींची ओळख पटली असली तरी त्यांचा पाठलाग करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. आघाव, केंद्रे यांनी चार पथके चार दिशांना रवाना केली. गाडी नगरच्या दिशेने जात असल्याचे कळाले. त्यानुसार पाठलाग सुरू झाला. पोलिसांच्या गाडीला आरोपींनी दोनचा जोरदार टक्कर दिली. पण टोलनाक्यापासून 13 किमी अंतरावर समोरूव ट्रक आल्याने आरोपींना गाडी रस्त्याच्या खाली उतरवावी लागली, आणि अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात आले. हे दोन्ही आरोपी मोबाइलच्या दुकानात कामाला होते. उधारी फेडण्यासाठी हा प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले.