Aurangabad Municipal Corporation officials-employees observed the second 'Cycle to Work Day'

औरंगाबाद : पर्यावरणाचे रक्षण आणि इंधन बचतीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी एक दिवस सायकलवर कार्यालयात येऊन ‘वर्क टू सायकल'(Cycle to Work Day) मोहिमेचा प्रारंभ  मनपा प्रशासकांनी केला होता. आगामी काळात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येणार असून १ डिसेंबरला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास त्यांच्या कामाच्या ठिकाणी सायकलचा वापर करण्याचे आवाहन औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एएससीडीसीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज मनपा अधिकारी आणि कर्मचारी हे सायकल वरुन कार्यालयात दाखल झाले.

यात प्रामुख्याने आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, सहायक आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे, विद्युत विभाग प्रमुख ए बी देशमुख यांचा समावेश होता .

वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाहनांच्या वापरात वाढ झाली असून, वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणातही वाढ होत आहे. या पृष्ठभूमीवर पर्यावरणाचे रक्षण आणि खनिज संपत्ती इंधन बचतीसाठी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या कार्यालयीन पहिल्या दिवशी ‘सायकल’द्वारे कार्यालयात येण्याचे आवाहन केले आहे .