औरंगाबाद मनपा
औरंगाबाद मनपा

कधीकाळी शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या नेहरू भवनची इमारत पाडून त्याजागी टीव्ही सेंटरच्या धर्तीवर मेगा शॉपिंग मॉल विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वर्षभरापूर्वीच सर्वसाधारण सभेने यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.दिल्लीच्या एजन्सीकडून यासंबंधीचा प्रकल्प विकास आराखडा तयार केला जात आहे. एकूण 30 कोटी रूपये खर्चून हे व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे, याकामी केंद्र सरकारकडून पालिकेला 15 कोटींचा निधीही मंजूर झाला आहे.

औरंगाबाद (Aurangabad).  कधीकाळी शहराचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या नेहरू भवनची इमारत पाडून त्याजागी टीव्ही सेंटरच्या धर्तीवर मेगा शॉपिंग मॉल विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वर्षभरापूर्वीच सर्वसाधारण सभेने यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.दिल्लीच्या एजन्सीकडून यासंबंधीचा प्रकल्प विकास आराखडा तयार केला जात आहे. एकूण 30 कोटी रूपये खर्चून हे व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे, याकामी केंद्र सरकारकडून पालिकेला 15 कोटींचा निधीही मंजूर झाला आहे.

पालिका प्रशासक तथा आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी नेहरू भवनच्या प्रकल्प आराखड्याविषयी शुक्रवारी दि.18 पत्रपरिषदेत माहिती दिली. शहरातील सांस्कृतिक चळवळींची गरज म्हणून नगरपालिकेच्या काळात सुमारे चाळीस वर्षांपूर्वी नेहरू भवन उभारले होते. या ठिकाणी नाटक, मुशायरा, गझलांच्या अनेक मैफली दिग्गज रंगकर्मींनी गाजविल्या. मात्र मागील काही वर्षांपासून ते अडगळीत पडले होते. इमारतीचा वापरही बंदच आहे. येथील खुली जागा लग्न, खासगी समारंभासाठी वापरली जात आहे. त्यातून पालिकेला उत्पन्नही कमीच मिळते. तर इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीवर जास्तीचा खर्च होतो. म्हणून ही इमारत पाडून त्याजागी प्रेक्षकगृह, समारंभ हॉल व मेगा शॉपिंग मॉल तयार करण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला. त्यानंतर कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून डीपीआर तयार करण्यासाठी दिल्लीच्या एजन्सीची नियुक्‍ती केली.

याविषयी आयुक्‍त पांडेय यांनी सांगितले की, दिल्लीच्या अनुभवी एजन्सीकडून नेहरू भवनचा डीपीआर तयार केला जात आहे. या कामासाठी एकूण 30 कोटींचा खर्च येत आहे. त्यापैकी 15 कोटींचा निधी हा केंद्र सरकारकडून विशेष योजनेतून मिळणार आहे. बाकी 15 कोटींचा निधी पालिकेच्या माध्यमातून टीव्ही सेंटरच्या धर्तीवर गाळेधारकांकडून उभा केला जाईल.

प्रकल्पाचा खर्च 13 कोटींवरून 30 कोटींवर!
नेहरू भवनाची जागा ही 4 हजार 50 चौरस मीटर एवढी आहे. त्यात 26 दुकाने, 24 व्यापारी कार्यालये, प्रेक्षकगृह आणि मेजवानी हॉल, वाहनतळ असे सुरूवातीचे नियोजन होते. याकामी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरसूचीनुसार अपेक्षित खर्च सुमारे 13.23 कोटी एवढा गृहित धरून पालिकेला अपेक्षित उत्पन्न 17 कोटी रूपये मिळेल, असे वर्षभरापूर्वी ठरले होते. मात्र आता याकामी तब्बल 30 कोटींचा खर्च येत आहे.

शिफारशीच्या एजन्सींचे प्रस्ताव फेटाळले
नेहरू भवनच्या मेगा शॉपिंग मॉलचा डीपीआर तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्‍त करताना निविदा प्रक्रियेत चार ते पाच कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यात दिल्लीची एजन्सी वगळता इतर एजन्सींना काम देण्यासाठी शहरातून काही खास व्यक्‍तींच्या शिफारशी आल्या होत्या. मात्र त्या शिफारशी येताच त्या एजन्सींची दारेच बंद केली आणि दिल्लीच्या अनुभवी एजन्सीला काम दिल्याचे आयुक्‍त पांडेय यांनी यावेळी आवर्जून सांगितले.