BJP criticizes the government for not taking strong action against atrocities against women
'या' घटनांविरोधात कठोर कारवाई करण्याची सरकारकडे इच्छाशक्तीच नाही : भाजपची टीका

कठोर कारवाई करण्याची इच्छाशक्ती सरकार दाखवत नसल्याची टीका भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री व राष्ट्रीय महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी महाराष्ट्रात घडलेल्या महिला अत्याचारांच्या २५ निवडक घटनांची माहितीदेखील जोडली आहे.

औरंगाबाद: हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पण महाराष्ट्रातील महिला अत्याचारांचे वास्तव आणि वस्तुस्थिती अधिक भीषण आहे. त्याबाबत कठोर कारवाई करण्याची इच्छाशक्ती सरकार दाखवत नसल्याची टीका भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री व राष्ट्रीय महिला आयोगाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी महाराष्ट्रात घडलेल्या महिला अत्याचारांच्या २५ निवडक घटनांची माहितीदेखील जोडली आहे.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा असलेल्या रहाटकर यांनी ठाकरे यांना लिहिलेल्या खरमरीत पत्रामध्ये सरकारचे महिला सुरक्षेच्या अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे. “दिशा कायद्याचे काय झाले?, महिला आयोगाचे अध्यक्ष आठ महिन्यांपासून रिकामे का?, कोविड सेंटर्समधील अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी एसओपी कधी निश्चित करणार?, काही घटनांची सुनावणी फास्ट ट्रक कोर्टात का चालविली जात नाही?, काही प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती का केलेली नाही?,”असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.

गेल्या काही महिन्यांतील अत्याचारांच्या २५ निवडक घटनांची माहिती देऊन रहाटकर यांनी लिहिले आहे, “या माहितीवर नुसती नजर जरी टाकली तरी अत्याचारांच्या जळजळीत वास्तवाने थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. आपण हाथरसमधील घटनेबाबत चिंता व्यक्त केली; पण राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, २०१९मध्ये महाराष्ट्रात हाथरससारख्या (बलात्कार व त्यानंतर खून) तब्बल ४७ घटना घडल्या आहेत.

अशा घटनांमध्ये देशात पहिल्या क्रमाकांवर असण्याची नामुष्की महाराष्ट्रावर ओढविली आहे. बलात्कार आणि महिला अत्याचारांच्या अन्य घटनांची संख्याही महाराष्ट्रात विलक्षण असल्याची माहिती ‘एनसीआरबी’च्या अहवालातून मिळते. अशास्थितीत आपल्या सरकारकडून कार्यक्षम पावले उचलली जात नाहीत. तशी कोणताही राजकीय इच्छाशक्ती दाखविली गेली नाही. महिला अत्याचारांच्यासंदर्भात नुसतीच गोड गोड भाषणे, पोकळ आश्वासने देऊन उपयोग नाही. गुन्हेगारांना जरब बसेल, अशा पावले सरकारने, पोलिसांनी उचलली पाहिजेत.”

विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.