राज्य सरकारचे अपयश लपवण्यासाठीच भाजपच्या आमदारांचं करण्यात आलं निलंबन,रावसाहेब दानवेंचा आरोप

भाजपाच्या बारा आमदारांना(BJP MLA Suspension) विधानभवनातून निलंबन करून राज्यातील राज्य सरकारने एक प्रकारे राज्यातील लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम केले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी म्हटले आहे.

    महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडी सरकारचे अपयश लपविण्यासाठी भाजपच्या बारा आमदाराचे राज्य सरकारने निलंबन केले असून, फक्त दोन दिवसाचे अधिवेशन बोलावून महाराष्ट्रातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

    प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, भाजपच्या आमदाराने ओबीसीचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्याचे प्रश्न आदी प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या भाजपाच्या बारा आमदारांना विधानभवनातून निलंबन करून राज्यातील राज्य सरकारने एक प्रकारे राज्यातील लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम केले असून ओबीसी व मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारला उघडे पाडल्यामुळे खोटे आरोप करून राज्य सरकारने भाजपच्या आमदारांचे निलंबन केले आहे हे अत्यंत चुकीचे आहे.

    ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही झगडत असतांना, आमच्या लोकांवर अश्या प्रकारची कार्यवाही होणे चूक आहे. अश्या प्रकारच्या कितीही कार्यवाह्या झाल्या तरी आम्ही सहन करु, पण ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत भाजपाचा संघर्ष सुरुच राहील, असेही दानवे म्हणाले.

    त्यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन हा एका नियोजित कटाचा भाग असून, तालिका सभापतींना कोणतीही शिवीगाळ भाजपच्या आमदारांनी केली नाही. विरोधकांची संख्या कमी केली तर आपल्यावर टीका कमी होईल असे राज्य सरकारला वाटते. ओबीसी व मराठा आरक्षणावर पूर्णपणे राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मागासवर्ग आयोग स्थापन करणे हा एकमेव पर्याय असल्याचे ठाकरे सरकारने तयार केलेली समितीच सांगते आहे. पण हे राज्य सरकार यासंदर्भात सुद्धा केंद्र सरकारकडे ठराव पाठवीत आहे, राज्य सरकारला फक्त वेळ काढावयाचा आहे व टोलवाटोलवी करावयाची आहे.

    विधानसभा अधिवेशन चालू असताना ओबीसी, मराठा, शेतकरी, एमपीएससीच्या प्रश्नावर सरकारला प्रश्न विचारले म्हणून जाणूनबुजून भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन केले असून, याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही असेही केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.