औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली कोविड लसीकरणाची रंगीत तालीम

कोविड लसीकरण करण्यासाठी प्रशासनाच्या पूर्वतयारीची रंगीत तालीम (ड्राय रन) बजाज नगरातील भगतसिंग शाळेमध्ये प्रत्यक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रशासनामार्फत सर्वोतोपरी योग्य पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे. याबाबत समाधान आहेच, मात्र, नागरिकांनी देखील प्रशासनास लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी केले.

औरंगाबाद (Aurangabad).  कोविड लसीकरण करण्यासाठी प्रशासनाच्या पूर्वतयारीची रंगीत तालीम (ड्राय रन) बजाज नगरातील भगतसिंग शाळेमध्ये प्रत्यक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. प्रशासनामार्फत सर्वोतोपरी योग्य पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे. याबाबत समाधान आहेच, मात्र, नागरिकांनी देखील प्रशासनास लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी केले.

प्रशासनाने केलेल्या लसीकरणाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणूनच नंदूरबार, जालना, नागपूर व पिंपरी चिंचवड या ठिकाणी रंगीत तालिम (ड्राय रन) राबविण्यात आली. त्याच धर्तीवर जिल्ह्यामध्ये आज बजाज नगरातील भगतसिंग शाळेत ड्राय रन घेण्यात आला. सकाळी 9 ते 11 या वेळेत स्वत: जिल्हाधिकारी चव्हाण यांनी लसीकरण अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून लसीकरण कार्यवाही प्रक्रियेची पाहणी केली. त्याचबरोबर शारीरिक अंतर ठेवून लसीकरण करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रतीक्षा कक्षांची संख्या अधिक असावी.

योग्य, सुक्ष्म नियोजनातून लसीकरण प्रकिया पार पाडण्याबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षकांना सूचना केल्या. लसीकरण केंद्रांवर मोबाईल चार्जिंगची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आवश्यक औषधी, रुग्णवाहिका, प्रशिक्षित मनुष्यबळाबाबत समाधान व्यक्त करताना प्रशासनाकडून लसीकरणाची सर्वोतोपरी तयारी झाली असल्याचे यावेळी सांगितले.

बजाज नगरातील भगत सिंग नगर शाळेतील या ड्राय रन मध्ये कोविड 19 आजारांवरील लशीशिवाय इतर सर्व प्रक्रिया आणि त्याला लागणारा वेळ याबाबतची प्रत्यक्ष पाहणी आणि चाचणी चव्हाण यांनी केली. या चाचणी दरम्यान एखाद्या नागरिकास अचानक एखादा त्रास सुरू झाल्यास आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या उपचाराबाबतही चव्हाण यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती जाणून घेतली. आरोग्य यंत्रणेकडून लसीकरणा दरम्यान घेत असलेली काळजी आणि बारकावे याबाबत माहिती जाणून घेतानाच आवश्यक त्या सूचनाही आरोग्य अधिकारी यांना केल्या.

लसिकरणाचे टप्पे आणि आवश्यक सूचना (Vaccination stages and necessary instructions) :
सुरूवातीला नागरिकाला प्राप्त झालेल्या एसएमएसची तपासणी पोलिस प्रवेशद्वारावरच करतील. त्यानंतर तपमान, ऑक्सीमीटरद्वारे आशा स्वयंसेविका तपासणी करून टोकन देतील. टोकनसह प्रतीक्षा कक्षात नागरिक प्रवेश केल्यानंतर आशास्वयंसेविका त्यांना योग्य अंतर राखून बसण्याची व्यवस्था करतील व ओळखपुराव्याची खात्री करतील. त्यानंतर क्रमाने व योग्य अंतराने आशास्वयंसेविका नागरिकास लसीकरण कक्षाकडे पाठवतील. लसीकरण कक्षात प्रवेश करण्यापूर्वी मोबाईलद्वारे कोविन ॲपच्या साहाय्याने शिक्षक संबंधित नागरिकांची नोंदणी करतील व नोंदणी केल्यानंतर नागरिकास लसीकरण कक्षात प्रवेश दिला जाईल. लसीकरण कक्षात आरोग्य सेविका लसीकरण करतील. शिवाय बायोवेस्टची व्यवस्थ‍ित विल्हेवाट लावण्यासाठीची आवश्यक ती कार्यवाही पार पाडतील. लस दिल्याबरोबर लशीमुळे काही त्रास जाणवल्यास आशा स्वयंसेविका किंवा आरोग्य सेविकांना कळविण्याबाबत सांगतील.

लस दिलेल्या जागी चोळू नका, असेही त्यांना सांगतील. शेवटी अर्धा तास लस घेतलेला नागरिक दुसऱ्या खोलीत तज्ज्ञ आरोग्य सेवकांच्या देखरेखीखाली राहील. लस दिल्यामुळे काही त्रास जाणवल्यास तत्काळ तेथील वैद्यकीय अधिकारी आवश्यक तो उपचार तत्काळ करतील. संपर्कासाठी केंद्रातील आशा स्वयंसेव‍िका, आरोग्य सेविका यांचे क्रमांकही फलकावर लावण्यात येतील. त्याचबरोबर राज्याच्या 104 हेल्पलाईन क्रमांक येथे उपस्थित तज्ज्ञांचा सल्लादेखील घेण्यात येईल, अशी सर्व प्रक्रिया प्रत्यक्षात चव्हाण यांनी भगतसिंग शाळा केंद्रावर पाहिली. तसेच आवश्यक त्या ठिकाणी सूचनाही केल्या. लसीकरणासाठी मनिषा कोळी, किरण राजपूत यांनी पुढाकार घेतला. लसीकरणासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्याने चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.

या लसीकरण मोहिमेमध्ये पोलिस, ग्रामपंचायत, महसूल आणि मनपा, आरोग्य यंत्रणा आदींच्या समन्वयाने लसीकरण मोहीम राबविण्यात येते आहे. त्या लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी पाहण्यासाठी हा ड्रायरन महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांना त्यांची भूमिकादेखील यातून कळण्यास मदत होणार असल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले.