“रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला पांढरे फासू” दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन कॉग्रेस आक्रमक

“रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला काळं फासलं तर ते दिसणार नाही त्यामुळे आम्ही काळं फासणार आहोत. त्यांनी जर पांढरे कपडे घातले असतील तर कपड्यांना काळं फासू आणि तोंडाला पांढरं फासू.” काँग्रेस सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी म्हटलं आहे.

  भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेत रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा उल्लेख देवाला सोडलेला वळू म्हणजेच सांड असा केल्याने आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस सेवादलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला पांढरे फासणार असल्याचा इशारा दिला आहे.

  दानवे यांच्या विधानानंतर विलास औताडे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले की, “भाजप नेते देशातील जनतेच्या समस्या, महागाई, बेरोजगारी, महिलांवर होणारे अत्याचार, कोरोना व लसीकरणतील अपयश यावर हे भाजपा सरकारचे मंत्री ब्र शब्द सुध्दा बोलायला तयार नाहीत. पेट्रोल, डिझेल, गॅस अशा जीवनावश्यक वस्तूंच्या वाढणाऱ्या भरमसाठ किंमती कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न हे सरकार करीत नसून केवळ गांधी घराण्याच्या नावाने खडे फोडण्यातचे काम करत आहेत.”

  “रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे विकासशुन्य खासदार असून केवळ काँग्रेसच्या नेत्यांवर तोंडसुख आहेत. अशा निष्क्रिय मंत्र्याना जनता नक्कीच धडा शिकवेल. भाजपाच्या मंत्र्यांकडे जनतेसमोर ठेवायला विकास कामाचे कोणतेही मुद्दे नसल्याने अशी वादग्रस्त टिप्पणी करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे आता आम्ही दानवेंच्या तोंडाला पांढरं फासणार आहोत.” असं विलास औताडे यांनी सांगीतलं आहे.

  अशा वाचाळ नेत्यांना भाजपच्या नेतृत्वाने आवर नाही घातला तर यापुढे देशभरात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

  काय म्हणाले होते रावसाहेब दानवे

  “राहुल गांधी यांना सध्या काहीच काम नसुन ते आपण देवाला वळू सोडतो त्या वळू सारखे वागत आहेत. त्या वळूला काहीच काम नसतं तो फक्त गावातून इकडून तिकडं भटकत असतो. खरंय की नाही?” असं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं.