कोरोनाने घात केला आणि कुटुंबाचाच झाला नायनाट ; मुख्याध्यापकासह पत्नीचा मृत्यू, भाचाही अपघातात ठार

दोन-तीन वर्षानंतर त्यांची गुणवता व बौद्धिक क्षमता पाहून संस्थाप्रमुखाने त्यांच्याकडे मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सोपवली. ते रोहिलागड येथील उच्च माध्यमिक शाळेवर कार्यरत होते. त्यांनी आपणास मिळणाऱ्या पगारातून दोन्ही भावांची मुले, बहिणीच्या मुलांचे शिक्षण, घर खर्च व शेती विकसित करण्यावर भर दिला.

  पाचोड (औरंगाबाद) : प्रतिकूल परिस्थितीत पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबियासह समाजातील दुर्लक्षित घटकातील मुलांचा विकास करण्याची खूणगाठ बांधणाऱ्या मुख्याध्यापकासह त्यांची पत्नी व रुग्णालयात त्यास भेटण्यासाठी गेलेल्या भाच्याचा रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर अपघातात मृत्यू झाल्याची हृदय पिळवून टाकणारी दुर्देवी घटना गेवराई (मर्दा) (ता.पैठण) येथे सोमवारी (ता.१९) सकाळी घडली.

  अधिक माहिती अशी, गेवराई मर्दा (ता.पैठण) येथील हनीफखाँ रतनखाँ पठाण (वय ४९) यांनी प्रतिकूल परिस्थितीत कसेबसे १९९६ साली एम.एस्सी. बीएडपर्यत शिक्षण घेऊन विवेकानंद शिक्षण संस्थेवर सर्वप्रथम सहशिक्षकाची नोकरी पत्काराली. त्यांना घरची परिस्थिती बिकट असल्याने कुणी मुलगी देण्यास धजावत नव्हते. परंतु आपसांतील नवगाव (ता.पैठण) येथील शबानाबानो यांच्यासोबत त्यांचा वीस वर्षांपूर्वी विवाह झाला.

  दोन-तीन वर्षानंतर त्यांची गुणवता व बौद्धिक क्षमता पाहून संस्थाप्रमुखाने त्यांच्याकडे मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सोपवली. ते रोहिलागड येथील उच्च माध्यमिक शाळेवर कार्यरत होते. त्यांनी आपणास मिळणाऱ्या पगारातून दोन्ही भावांची मुले, बहिणीच्या मुलांचे शिक्षण, घर खर्च व शेती विकसित करण्यावर भर दिला. सर्व काही व्यवस्थित सुरु असतानाच त्यांच्या कर्तृत्व व स्वप्नाला नजर लागली. अन् गुरुवारी (ता.आठ) अचानक फ्रिजमधील थंड प्यायल्याने त्यांना घशाचा त्रास सुरु झाला. ते आपल्या पत्नीसह जालना येथील खासगी रुग्णालयात गेले.

  डॉक्टरांनी दोघा पती-पत्नीला गृहविलगीकरणाचा सल्ला दिला. मात्र त्यांनी घरी येण्याऐवजी रुग्णालयातच उपचार करण्यास पसंती दिली. मध्यरात्री दोघांचा ताप वाढून ऑक्सिजन कमी पडू लागले. अन् अशातच पत्नी शबानाबानो पठाण (वय ४४) यांचा शुक्रवारी (ता.नऊ) मृत्यू झाला. तर हनिफखाँ पठाण यांस पत्नीच्या मृत्यूची कोणतीही भणक लागू न देता रुग्णालयातच उपचारासाठी हनिफखाँ यांस ठेवण्यात येऊन पत्नीच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला. दोन दिवसांनी रविवारी (ता.११) हनिफखाँ पठाण यांचा गावांतील ३२ वर्षीय भाचा रियाज चाँद पठाण हा त्यास भेटण्यासोबतच जेवणाचा डबा घेऊन जालना येथे पोचला.

  हनिफखाँ पठाण ज्या रुग्णालयात होते, ते रूग्णालय हाकेच्या अंतरावर असताना एका वाहनाने त्यास जोराची धडक दिली आणि रियाज पठाण जागीच ठार झाला. मेहुण्यांसह घरच्यांना शबानाबानो अन् रियाजच्या मृत्यूचे दुःख पचवणे शक्य नसले तरी त्यांनी हनिफखाँ यांच्यासाठी दुःख गिळत त्यास या दोन्ही घटनांची कल्पना न देता त्यांच्या उपचार कामी मदत सुरु ठेवली. मुख्याधापक हनिफखाँ पठाण यांस शुक्रवारी (ता.१६) उपचारासाठी औरंगाबादला हलविले. मात्र सर्व नातेवाईक, मित्र डॉक्टर यांना अथक परिश्रम घेऊनही पदरी अपयश मिळाले. सोमवारी (ता.१९) पहाटेच मुख्याध्यापक पठाण यांची प्राणज्योत मालवली. आठवडाभरात एकाच कुटुंबातील तरुण, धष्टपुष्ट असलेले तिघे जण नियतीने हिरावून नेले. घरातील ‘सख्खे’ सोडता कुणी अंत्यविधीला हजेरी लावली नाही.

  प्रत्येकाला आपापाल्या जीवाचे पडले असे म्हटले तर वावगे वाटु नये. मुख्याधापक पठाण यांचा मृतदेह गावी आणण्यास प्रशासनाने विरोध दर्शविल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील गंजेशाहीदा कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. हनिफखाँ पठाण यांचे पश्चात तीन चिमुकली मुले असून एक इयत्ता बारावीत तर दुसरा आठवीत तर तिसरा तिसरीत शिक्षण घेत आहे. एकंदरीत घटना अंगावर शहारे आणणारी आहे. मुख्याध्यापक पठाण निधनापूर्वी मोबाईलवर सर्वांशी मनमोकळे बोलत होते. अन् अचानक कोरोनाने त्यांचा बळी घेतला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रत्येकजण आता या घटनेमुळे स्वतःची काळजी घेऊ लागला आहे.