‘कोविडशील्ड’ शहरात दाखल ; पाच केंद्रावर प्राथमिक टप्प्यात होणार वाटप -डॉ. नीता पाडळकर

शनिवारी, १६ जानेवारी पासून प्राथमिक टप्प्यात शहरातील आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्याची सुरुवात करण्यात येईल- डॉ. पाडळकर

औरंगाबाद: केंद्र सरकारने राज्यांना कोरोना लसीचे वितरण केल्यानंतर राज्य सरकारकडून औरंगाबाद शहरासाठी २० हजार कोरोना लसींचा पुरवठा बुधवारी प्राप्‍त झाला. येत्या शनिवारीपर्यंत शहरातील पाच केंद्रांवर प्राथमिक टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस दिली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. दरम्यान कोरोना लसीचे बॉक्स व्हॅनमध्ये टाकताना पालिकेचे कर्मचारी विनामास्क आढळून आल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला.
कोरोना लसीचा पुरवठा प्राप्‍त होताच केंद्र सरकारकडून विविध राज्यांना त्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातही कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यासाठी कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला. शहरातील सिडको एन-५ येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात कोरोना लस घेऊन व्हॅन दाखल झाली. तेथून पालिकेच्या मोबाइल व्हॅनमध्ये या लसींचे बॉक्स टाकण्यात आले. मात्र यावेळी पालिकेचे कर्मचारी विनामास्क आढळून आले. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्‍त बी.बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, उपायुक्‍त अपर्णा थेटे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. उजवला भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती. औरंगाबाद जिल्ह्यासाठी प्राप्‍त झालेल्या एकूण लसींच्या पुरवठ्यातून शहरासाठी २० हजार कोरोना लस प्राप्‍त झाल्या आहेत. यांचा साठा बन्सीलालनागर येथील पालिकेच्या व्हॅक्सीन कोल्डस्टोरेज येथे करण्यात आला आहे. शनिवारी १६ जानेवारी पासून प्राथमिक टप्प्यात शहरातील आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्याची सुरुवात करण्यात येईल, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. नंतरच्या टप्प्यात १२२ लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी डॉ. मुजीब यांनी ही कोरोना लस सुरक्षित असून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले.

या पाच केंदांवर शनिवारी लसीकरण : शासन निर्देशानुसार सद्यस्थितीत शहरात पाच लसीकरण केंद्रांवर डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येईल. यात भिमनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सिडको एन-११ येथील ड्राय रन केंद्र, सादातनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सिल्कमिल्क कॉलनी हॉस्पीटल, बन्सीलालनगर हॉस्पीटलचा यांचा समावेश आहे, असे डॉ. पाडळकर यांनी स्पष्ट केले.