प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

  • कागद विरहीत गो-ग्रीन वीजबील सुविधेवर महावितरणकडून दहा रुपयांची सवलत

औरंगाबाद (Aurangabad) :  वीजग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहित करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना प्रति बील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीज बिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीज बील मिळणार असून संदर्भासाठी वीज बिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे.तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. वीज ग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांनी केले आहे.

महावितरणच्या ग्राहकांना (Mahavitaran Customer) वीज बिलाची माहिती व वीजबील भरण्यासाठी मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेत स्थळावर ऑनलाईनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीज बीलही उपलब्ध करून देण्यात येते; परंतु जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल (E-mail) व एसएमएसद्वारे (by SMS) वीजबील (electric bill) उपलबद्ध करून दिले जाते. या सर्व ग्राहकांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रती बिल १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीज बिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर  पुढील लिंकवर जाऊन करावी लागणार आहे. —– https://billing.mahadiscom.in/gogreen.php

औरंगाबाद परिमंडलात गो—ग्रीन वीज बिल ८०९६ वीज ग्राहकांनी पर्याय निवडून आर्थिक बचत केली आहे. लातूर परिमंडलात गो — ग्रीन वीज बिल ६५२३ वीज ग्राहकांनी पर्याय निवडून आर्थिक बचत केली आहे. तर नांदेड परिमंडलात गो— ग्रीन वीज बिल ४८०९ वीज ग्राहकांनी पर्याय निवडून आर्थिक बचत केली आहे, असे एकूण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत १९,४२८ वीज ग्राहकांनी गो—ग्रीन वीज बिलाचा पर्याय निवडून आर्थिक बचत केली आहे. शिवाय पर्यावरणस्नेही झाले असल्याचे पाऊलही टाकले आहे. मराठवाडयातील वीज ग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांनीही केले आहे.