पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जरी टिव्हीवर येऊन रडले तरी आता कुणी त्यांचे ऐकणार नाही – एमआयएमच्या खासदाराचा इशारा

लॉकडाऊन उठवला नाही, तर १ जूननंतर दुकाने सुरु करणार असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz jalil) यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

    औरंगाबाद:  कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या कठोर निर्बंध लागू आहेत. १ जूननंतर लॉकडाऊन कायम राहणार की उठवला जाणार यावरुन सध्या राज्यात चर्चा रंगली आहे. ठाकरे सरकारने(Thakre Government) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर आणलेल्या निर्बधांमध्ये दुकानांचाही समावेश आहे.

    सरकारने दुकाने सुरु ठेवण्यासाठी सकाळी ७ ते ११ ची वेळ दिली आहे. पण ही सूट फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाच आहे. दरम्यान लॉकडाऊन उठवला नाही, तर १ जूननंतर दुकाने सुरु करणार असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz jalil) यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

    कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन शिथील करण्याची गरज असून लॉकडाऊनचे पालन आम्ही करणार नसल्याचे औरंगाबादची जनता सांगत आहे. त्यांच्या बोलण्यातही लॉजिक आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी शहराचा आकडा १८०० वर गेला होता, पण आज आपण १२० वर आलो आहोत. ग्रामीण भागात २०० च्या आसपास आलो आहोत. लोकांनी एवढे सहकार्य केले आहे, एवढे कष्ट सहन करुन आकडेवारी कमी केली. आता पुन्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन ज्ञान पाझळणार असतील तर त्यांचे कोणीही ऐकणार नाही. मग पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मी सांगो, औरंगाबादकर जनता १ तारखेनंतर कोणाचेही ऐकणार नसल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

    पंतप्रधानांचे तर आम्ही २०० टक्के ऐकणार नाही. या देशातील त्यांचे भक्तही ऐकणार नाही. त्याचे कारण देशात जेव्हा लाखोंच्या संख्येने लोक रडत होते, तेव्हा आदरणीय पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये जाऊन ‘दीदी ओ दीदी’ असे करत होते. आता लोक त्यांना ‘दादा गप्प बस दादा’ म्हणणार आहेत. ती वेळ आता आली असून स्वत: पंतप्रधानांनी ती आणली आहे. आता टीव्हीवर येऊन रडण्याचे काही कारण नाही. आम्हाला माहिती आहे कोण कसा अभिनय करते. जेव्हा लोकांना सांभाळण्याची वेळ होती, तेव्हा जाऊन प्रचार करत होता, लाखोंच्या संख्येने गर्दी गोळा करत होता आणि आता ज्ञान पाझळत आहात, अशा शब्दांत यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला.